WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे सुरु आहेत ऑन लाईन वर्ग, पण फी भरण्याच्या तगाद्याने चिंतेत आला सामान्य पालकवर्ग

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोरोना ही वैश्विक महामारी देशात अवतरली आणि सर्वच होत्याचं नव्हतं झालं. लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून अद्यापही देश पूर्णपणे बाहेर निघू शकलेला नाही. रोजगार, नोकऱ्या हिरवाल्या गेल्याने आर्थिक दुर्बलता आली व कुटुंबाचे पालन पोषण करण्यात असमर्थ ठरल्याने मानसिक दुर्बलता आली. तर शिक्षण लॉकडाऊन झाल्याने बौद्धिक दुर्बलताही जाणवू लागली आहे. कोरोनामुळे शिक्षणाचा पार बोजावरा झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येत नसल्याने शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. अशात नवीन सत्रही सुरू झाले. मात्र शैक्षणिक बंदी उठवण्यावर अद्यापही एकमत न झाल्याने शैक्षणिक धोरणांची वाताहत झाली आहे. शिक्षणाचा खोळंबा झाल्याने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ढासळत चालली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण ऑन लाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून झूम ऍप लिंकच्या माध्यमातून सुरु असलेली ऑन लाईन शिक्षण प्रणाली इंटरनेटच्या न मिळणाऱ्या रेंज मुळे डोके दुखी ठरली आहे. ऑन लाईन वर्ग सुरु असतांना नेटवर्क अभावी शिक्षक व विद्यार्थ्यांचा ताळमेळ जुळत नसल्याने विद्यार्थी अक्षरशः चिडून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोबाईलकडे सारखे पाहावे लागत असल्याने मुलांना मानेच्या दुखण्याचा त्रास होत असून मुलांच्या दृष्टीवरही मोबाईल स्क्रीनचा विपरीत परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काही मुले मोबाईलच्या अगदीच आहारी गेल्याचे दिसून येत असून ऑन लाईन वर्ग झाल्यानंतरही ते मोबाइलमध्येच गुंतून राहतांना दिसतात. ऑन लाईन शिक्षणाचा लाभही मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळाला आहे. आर्थिक झळा सोसत असलेल्या पालकांना आपल्या पाल्यांकरिता स्मार्ट फोन घेणे शक्य न झाल्याने ते ऑन लाईन शिक्षणापासून आजही वंचित राहिले आहेत. काही पालकांनी अशाही परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाला प्राथमिकता देत उसनवारी करून स्मार्ट फोन खरेदी केले पण मुलांना ऑन लाईन शिक्षणात अनेक अडचणी येत असल्याने ऑन लाईन शिक्षण मुलांच्या समजण्यापलीकडे असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. अशातच ऑन लाईन शिकविलेल्या अभ्यासक्रमातून ऑन लाईन टेस्ट घेण्यात आल्या व घरी सोडविण्याकरिता पेपरही देण्यात आले. पण निकाल देतांना आधी संपूर्ण महिन्यांची फि भरण्याची अट ठेवण्यात आली. आज सामान्य व्यक्ती आर्थिक संकटात होरपळून निघाला असून त्याच्याकडे बंद काळातील शुल्काची मागणी करणे म्हणजे त्याच्यावर आर्थिक बर्डन लादल्या सारखे आहे. प्रत्येक सामान्य माणूस आपल्या मुलाला शिकविण्यासाठी धडपडत असतो. उपासमार सहन करूनही मुलाला शिकविण्याची त्याची जिद्द असते. पण कोरोनाच्या या काळाने सामान्य माणसाला बेजार करून सोडलं आहे. सामान्यांची हुशार मुलं मोलमजुरी करीत आहेत, शेतात व शेतमजुरीत राबत आहे. या मुलांना आज शैक्षणिक संस्थांनी आधार देण्याची गरज आहे. खाजगी शिक्षण संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन विद्यार्थ्यांच्या मासिक शुल्कातुनच होत असते, हे खरे असले तरी आज काळ बिकट आला आहे. अल्प मिळकतीत कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे. मिळकत मंदावल्याने आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत असले तरी मुलांना शिकविण्याची जिद्द आजही ते जोपासून आहेत. शिक्षकांच्याही शैक्षणिक योगदानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शिक्षकांनाही ऑनलाइन शिक्षण हा प्रयोग नवीन असतांना शिक्षकांनी अल्पावधीतच हा प्रयोग उत्तमरित्या आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले. वेतनाची आस न ठेवता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी खंड पडू न देता ऑन लाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. एकमेकांच्या सहकार्यानेच या संकट काळावर मात करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून खाजगी शिक्षण संस्थांनी शुल्काबाबत उचित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

शहरात छोट्यामोठ्या अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. मार्च पासून या शाळा बंद असल्याने संस्था चालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संस्थांमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. पालकांनी शुल्क जमा न केल्यास नाइलाजास्तव शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते, असे संस्थाचालक बोलू लागले आहेत. त्यामुळे शासनाने कोरोना आपात्कालीन फंडातून कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, २०१८-१९ मधील आरटीईअंतर्गत शिक्षण विभागाकडे थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी, २०१९-२० ची शंभर टक्के फी परतावा रक्कम तातडीने अदा करावी, ऑनलाइन शिक्षण पद्धतीसाठी येणाऱ्या खर्चासाठी संस्थांना ऍडव्हॉन्स रक्कम देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ इंग्लिश स्कूल, ट्रस्टीस असोसिएशनच्या वतीने मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. शाळा महाविद्यालये सुरु करण्यावर एकमत होत नसल्याने शाळा कुलूपबंद असून शाळा मोकाट जनावरांचे व व्यसनाधीन व्यक्तींच्या आश्रयस्थान बनले आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑन लाईन वर्ग सुरु केले. पण नेटवर्क, होमवर्कच्या आड येत असल्याने ऑन लाईन शिक्षण डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शिक्षण संस्थांनी शुल्क भरण्याचा तगादा लावल्याने सामान्य पालकवर्ग चिंतेत आला आहे. तेंव्हा शिक्षण संस्था व पालक वर्गांनी आपसात योग्य सांगड घालून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा योग्य तोडगा काढण्याची अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share