एफसीआय कोलडेपोतील लेखापालाचा रेल्वेने कटून मृत्यू
फ्युलको प्रा. ली. (एफसीआय) या कोल डेपोमध्ये अकॉन्टउंट म्हणून कार्यरत असलेल्या एका युवकाचा रेल्वेखाली येऊन कटून मृत्यू झाल्याची घटना आज ११ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील चिखलगाव रेल्वे गेटजवळ घडली. विजय अग्रवाल (४५) रा. एफसीआय क्वाटर चिखलगांव असे या युवकाचे नाव आहे. माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे समोर आल्याने विजय अग्रवाल याचे हात पाय कटल्याने त्याला नागपूर येथे उपचाराकरिता नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
एफसीआय कोलडेपोमध्ये लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या विजय अग्रवाल याचा शहरातील नामांकित खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्याला साथीचा आजार झाल्याने तो एक दोन दिवस खाजगी रुग्णालयातच भरती असल्याचे समजते. कोलडेपोमध्ये अतिशय प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्याची ओळख होती तर मनमिळाऊ स्वभावाने तो सर्वानाच जवळचा वाटायचा. त्याला एक भाऊ असून तो मानसिक आजारग्रस्त असल्याने त्याचे लग्न न होऊ शकल्याने विजय अग्रवालनेही लग्न केले नाही. आजारग्रस्त झाल्यापासून तो मानसिक तणावामध्ये रहात असल्याचे समजते. आज लुंगी बनियांवर तो रेल्वे रुळावर गेला. समोरून रेल्वे येत असल्याने गेटमेनने त्याला हटकले असता समोर जात असल्याचे कारण सांगून तो गाडीच्या दिशेने गेला व रेल्वे रुळावर उभे राहून रेल्वे खाली येत त्याने स्वतःचे जीवन संपविले. रेल्वे गेटच्या विरुद्ध बाजूस असलेल्या एफसीआयच्या प्लॉटवरील क्वाटरमध्ये तो रहात होता. मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांनाच तो जवळचा वाटत होता. त्याच्या या अकाली जाण्याने एफसीआय कोलडेपो वर्तुळात हालहाल व्यक्त होत आहे.