WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुकान व कंपन्यांमधील अस्थायी कामगारांचे होत आहे शोषण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) :- देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचे संक्रमण वाढू नये या कारणास्तव शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. उद्योग, कारखाने, कंपन्याही जनसंपर्कातून संसर्ग वाढण्याच्या भीतीने बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे कित्येकांचे रोजगार व नोकऱ्या हिरावल्या गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले. रोजंदारीचीही कामे बंद पडल्याने मजूरवर्ग आर्थिक संकटात येऊन त्यांच्यासमोर उदर्निवाहाचे प्रश्न निर्माण झाले. दोन सांजेच्या भाकरीचीही सोय करणे कठीण झाल्याने मजूरवर्गावर उपासमार सहन करण्याची वेळ आली. औद्योगिक जिल्हे व महानगरांमध्ये नोकरी व्यवसायाकरिता स्थायिक झालेले नागरिकही रोजगार हिरवल्याने स्वगावी परतले. त्यामुळे कुटुंबावरील भार वाढून उपजीविकेचे संकट आणखीच गडद झाले. कुटुंबातील कर्ते पुरुष बेरोजगारीच्या सावटात आल्याने कुटुंबाचा आर्थिक कणा मोडून कुटुंबावर हालाकीचे जीवन जगण्याची वेळ आली. हालाकीच्या परिस्थितीशी झुंजताना मनाचे खच्चीकरण झाल्याने कित्येकांनी जीवनाला पूर्ण विराम दिला. तर काहींनी परिस्थितीला धैर्याने तोंड देत, परिस्थितीशी झुंजत, संकटावर मात करीत जगण्याचा संघर्ष सुरु ठेवला. पण अशा व्यक्तींना आज रोजगार नोकरीच्या ठिकाणी मालकवर्गाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रोजंदारी, मजुरी व खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींची मालकांकडून विडंबना करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या व खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना गुलामाप्रमाणे वागविले जात असून नोकरीवरून काढण्याच्या धमक्या देत खालच्या दर्जाची शिवीगाळ केली जात असल्याच्या तक्रारी अनेक नोकरदारवर्गातून ऐकायला मिळत आहे. दुकाने व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतल्या जात आहे. मंदीचे कारण पुढे करत मोजक्या कामगारांकडून जास्तीचे काम काढून घेण्याचे कुटील कारस्थान सुरु आहे. संकटाच्या या काळात रोजगार नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्याने खाजगी मालकांची दबंगिरी वाढली आहे. कामावरून काढण्याच्या धमक्या देत कामगारांचे शोषण करणे सुरु आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कामगारही मालकांचे अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करीत आहेत. दुकाने व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अस्थायी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे कोणतेच संगठन नसल्याने या कामगारांना आपल्या व्यथा कुणाला सांगाव्या हेच कळत नाही. कमी पगारात जास्त काम काढून घेणे, ही मालकांची प्रथा होऊन बसली आहे. तर कमी पगारात जास्त वेळ राबणं कामगारांची व्यथा होऊन बसली आहे. कोरोनाच्या या संकट काळात बेरोजगारीत भरडल्या गेलेल्यांना उद्योगधंदे व कंपन्या सुरु झाल्याने काही प्रमाणात काम मिळाले खरे पण त्यांची चांगलीच पिळवणूक करण्यात येत आहे. रोजगार नोकऱ्यांचा वानवा असल्याने कामगारही मालकांकडून होणारी विडंबना निमूटपणे सहन करून मिळालेल्या नोकरीत टिकून राहण्यातच धन्यता मानत आहे. वणी तालुका कोळसा खदानींनी वेढला असल्याने कोल ट्रान्सपोर्टींग व कोळसा व्यवसायाच्या माध्यमातून अनेक रोजगार याठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु बहुतांश कोल ट्रान्सपोर्टींग कंपन्या व कोळसा व्यावसायिक परप्रांतीय असल्याने ते परप्रांतीयांनाच रोजगारात प्राथमिकता देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सुपरव्हिजनमध्ये स्थानिकांना कामगार म्हणून ठेवण्यात येत असले तरी त्यांना नेहमी दुय्यम वागणूक मिळते. आता तर मंदीचे कारण सांगून कामगारांना नोकर कपातीची धास्ती दाखवून त्यांना हवे तसे राबवून घेतले जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share