WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी तालुक्याची लोकवाहिनी नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई ते नांदेड पर्यंत सुरु

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी रेल्वे गाड्याही बंद ठेवण्यात आल्या. परंतु अनलॉक प्रक्रियेच्या चौथ्या व पाचव्या टप्यात कोरोनाचे नियम पाळून काही प्रवासी रेल्वे गाडया सुरु करण्यात आल्या. यामध्ये वणी वासियांच्या प्रवासाची धुरा सांभाळणारी नंदीग्राम एक्सप्रेसही मागच्या रविवारपासून मुंबईवरून नांदेड पर्यंत सुरु करण्यात आली. जंक्शन टू जंक्शन चालवण्यात येणारी नंदीग्राम एक्सप्रेस वणी मार्गे नागपूर पर्यंत वाढविण्यात न आल्याने तालुक्यातील प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नागपूर व मुंबईच्या प्रवासाकरिता वणी वासियांच्या पसंतीस पात्र ठरलेली नंदीग्राम एक्सप्रेस वणीला न येता नांदेड पर्यंतच चालविण्यात येत असल्याने नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. वणीतील जनतेला अंगाखांद्यावर बसवून प्रवासाला नेणारी लोकवाहिनी मागील सात महिन्यांपासून दृष्टीआड झाली आहे. सकाळी ९ व दुपारी १२.३० वाजता नंदिग्रामच्या येण्यानं गजबजणारं वणी रेल्वे स्टेशन आता ओसाड झालं आहे. प्रवासाला धावून येणारी हक्काची गाडीच लुप्त झाल्याने वणी रेल्वे स्टेशन वांझोटं झालं असून येथे स्मशान शांतता पसरली आहे. सकाळी ९ वाजता डिजल इंजिनचा आवाज आला की, नंदीग्राम आली वाटतं, हा एकच सूर सर्वांच्या तोंडातून ऐकायला मिळायचा. प्रवाशांची प्रवासाकरिता होणारी लगबग, ऑटोंची रेलचेल, चाय नास्ता विकणाऱ्यांची धडपड सारच तिचं प्रस्थान होई पर्यंत खुणावत असायचं. पण आता रेल्वे विभागानं प्रवाशांना लोकवाहिनी पासून दूर ठेऊन तिच्याशी जुळलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यांचीच ताटातूट केली आहे. नंदीग्राम एक्सप्रेस नांदेड पर्यंत येते व वणीला येत नाही, ही माहिती मिळाल्याने एकीकडे प्रवाशी दुखावले आहे तर दुसरीकडे रेल्वे विभागाविषयी जनतेत संताप निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली नंदीग्राम एक्सप्रेस वणीवरून केंव्हा धावेल याकडे आता संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

७ ऑक्टोबर पासून वणी रेल्वे स्टेशन वरून ४ सुपर फास्ट गाड्या धावत आहे. बल्लारशा ते काजीपेठ पर्यंत तिसरा रेल्वे रूळ तयार करण्याचे काम सुरु असून या रुळावरून माल वाहतूक होणार आहे. त्यामुळे दक्षिणे कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या माजरी मार्गे वणीवरून वळविण्यात आल्या आहे. पिंपळखुटी अदिलाबाद मार्गाने या गाड्या धावत आहे. दुरंतो, सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेससह चार गाड्यांचे अप डाऊन सुरु आहे. वणी स्टेशनवर या गाड्यांचा थांबा नाही. १८ ऑक्टोबर पर्यंत या गाड्या वणी मार्गे धावणार आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share