वणी वडगांव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची झाली चाळणी
शहर व तालुक्यात रस्ते दुरुस्तीकरणाच्या कामांना वेग आला असतांना वणी वडगांव रोड मात्र दुरुस्तीकरणापासून नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. पावसामुळे खड्डे तुडुंब भरल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर किनारही उरली नसल्याने जीव धोक्यात घालून खड्ड्यांमधून अंदाज बांधून दुचाक्या काढाव्या लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून रस्ताच खड्ड्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे संबंधित विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
वणीवरून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. अनेकदा तक्रारी निवेदने देऊनही या रस्त्याचे पूर्णपणे दुरुस्तीकरण करण्यात आले नाही. या मार्गावर खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांना नेहमी या रस्त्याने जाणे येणे करावे लागते. वडगांव येथील नागरिक व शेतकरीवर्ग दैनंदिन खरेदी व कामकाजाकरिता नेहमी शहरात येत असतो. कित्येकदा या रस्त्यावरून दुचाक्या घसरून पडल्याने नागरिक जखमी झाले आहेत. शाळेच्या सहकार्याच्या अपेक्षेत या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची कित्येक वर्षांपासून ओरड सुरु असतांनाही संबंधित बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढतांना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित बांधकाम विभाग दुर्घटना होण्याचीच वाट बघत आहे की काय असे वाटू लागले आहे. थातुर मातुर रस्त्यांची डागडुजी करून किंवा केल्याचे कागदोपत्री दाखवून निधीची आपसात विल्हेवाट लावल्या जात असल्याचेही आता उघडपणे बोलल्या जात आहे. शहरातील काही अंतर्गत रस्ते व गावखेड्यांकडे जाणारे रस्ते निधी लाटण्याच्या प्रयत्नात नेहमीच दुर्लक्षत राहिले आहेत. तेंव्हा नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्या अगोदर वणी वडगाव रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.