तालुक्यात आज सात व्यक्तींना कोरोनाची लागण
corona update १७ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहर व तालुक्यातील कोरोनाची रुग्ण वाढ मंदावली असून प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णातही लक्षणीय घट झाली आहे. आज सात व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९६ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. दोन दिवसांत तीन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६६१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आज १२ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर ७ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २० रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १८ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ३२ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६५ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. आज तालुक्यात सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६९६ झाली असून ६६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १३ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये विठ्ठलवाडी येथील दोन, चिखलगांव एक, निवली एक, शिवाजी चौक एक, घुग्गुस येथील एक तर वरोरा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. वरोरा येथील व्यक्ती खाजगी रुग्नालयात उपचाराकरिता आल्यानंतर त्याची कोविड केयर सेंटरला तपासणी करण्यात आली. त्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये तो निगेटिव्ह तर आरटी पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आला. घुगुस येथील व्यक्ती सुंदर नगर येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून तो ही आरटी पीसीआर चाचणीतच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. विठ्ठलवाडी येथे बऱ्याच दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने याठिकाणी कोरोनाने परत एकदा डोके वर काढल्याचे आढळून येत आहे. विठ्ठलवाडी येथे आता पर्यंत २७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ट्रामा केयर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड तयार झाल्याने सोमवार पासून पळसोनी कोविड केंद्रातील मुख्य वैद्यकीय स्टाफ ट्रामा केयर सेंटरमध्ये शिफ्ट होणार असून येथेच आता रुग्णांचे निदान व उपचार होणार आहेत. सौम्य लक्षण असलेले रुग्णच आता पळसोनी येथील कोविड केयर सेंटरमध्ये भरती राहणार असल्याचे समजते. प्रशासन कोरोनावर नियंत्रण ठेऊन असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.