तालुक्यात आज आठ व्यक्तींना कोरोनाची लागण
corona update १८ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहर व तालुक्यातील कोरोनाची रुग्ण वाढ मंदावली असून प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णातही लक्षणीय घट झाली आहे. कोविड योद्धे परत कोरोनाग्रस्त होतांना दिसत आहे. पोलीस क्वाटर मधील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज आठ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७०४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. आज आणखी सहा रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आज १९ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर १४ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २४ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये तीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर २१ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २३ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६९ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. आज तालुक्यात आठ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७०४ झाली असून ६६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १३ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सुंदर नगर येथील चार, साधनकर वाडी येथील एक तर पोलीस क्वाटर येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण ठेऊन असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.