शुल्लक कारणावरून पती पत्नीला बेदम मारहाण
घरापुढे बैलं धुण्यास विरोध केल्याच्या शुल्लक कारणावरून पती पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना १८ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोर्डा गावात घडली. मारहाण झालेल्या दाम्पत्याने याबाबत पोलीस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोर्डा गावात वास्तव्यास असलेल्या सुरेखा अंकुश मिलमिले (२८) व अंकुश मिलमिले (३२) या दाम्पत्या सोबत त्याच गावातील सुरेश देवराव विधाते (४२) हा नेहमी विनाकारण वादावादी करून अंगावर चालून यायचा. घटनेच्या दिवशी सुरेश व त्याचा साळा निलेश राजूरकर (३५) हे अंकुश मिलमिले याच्या घरासमोरील न्हाणी घराजवळ बैले धूत होते. बैलांवर शिंपडण्यात येणारे पाणी त्याठिकाणी कपडे धूत असलेल्या सुरेखा मिलमिले यांच्या अंगावर उडत असल्याने त्यांनी बैलांना थोडे बाजूला धुण्यास सांगितले. अगदी घरासमोरच बैलं धुतली जात असल्याने जाण्या येण्याच्या मार्गावर चिखल होत असतांना तसेच कपडे धुण्याच्या वेळेलाच बैलं धुतली जात असतांना सुरेखा मिलमिले यांनी आक्षेप घेतला असता सुरेश विधाते व त्याच्या कुटुंबीयांनी दोघाही पती पत्नीला बेदम मारहाण केली. नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद घालून अंगावर चाल करणाऱ्या सुरेश विधाते कुटुंबाकडून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचेही सुरेखा मिलमिले यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सुरेश विधाते यास अटक केली असून त्याच्यासह नलु सुरेश विधाते, प्रज्ञा सुरेश विधाते व निलेश राजूरकर यांच्यावर भादंवि च्या कलम ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.