शहरातील दीपक चौपाटी येथे झालेल्या हाणामारीत दोन जण गंभीर जख्मी
शहरातील दीपक चोपाटी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. काल २० ऑक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातील एका बार समोर दोन मद्यपी युवकांमध्ये वादावादी होऊन झालेल्या तुफान हाणामारीमध्ये एकाने दुसऱ्यावर घातक शस्त्र उगारले तर दुसऱ्याने मित्रांना बोलावून शस्त्र उगारणाऱ्याला जबर मारहाण केल्याने दोघेही गंभीर जख्मी झाले. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी केल्याने व अनपेक्षितपणे पोलीस त्याठिकाणी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. त्यातील एकाला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारी प्रवृत्तीनेही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. छोट्यामोठ्या मारामाऱ्यांसह घातक शस्त्रांनीही वार होऊ लागले आहेत. दीपक चौपाटी जवळच्या काही भागातील मद्यपींचा दीपक चौपाटी हाच एकमेव ठिय्या असल्याने रात्रीच्या सुमारास मद्यपींचा याठिकाणी उभा धिंगाणा असतो. १७ सप्टेंबरला याच परिसरातील एका बारसमोर दोन मित्रांमध्ये झालेल्या मारामारीत रामपुऱ्यातील एका युवकाचा बळी गेला होता. काल २० ऑक्टोबरला अशाच दोन मद्यपी युवकांमध्ये दुचाकीला आडवे येण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत होऊन एकाने दुसऱ्यावर शस्त्र उगारले तर तर दुसऱ्याने मित्रांना बोलावून शस्त्र उगारणाऱ्याला बेदम मारल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ललित मधू चवरे (३४) रा. सेवानगर हा आपल्या मित्रासोबत दुचाकीने जात असतांना राहुल अशोक पानघाटे (२८) रा. रामपुरा वार्ड हा त्याच्या दुचाकीला आडवा आल्याने जाब विचारण्यावरून झालेला वाद एकमेकांना जबर मारहाण करण्यापर्यंत पोहचला. राहुल पानघाटे याने घातक शस्त्र उगारले तर ललित चवरे याने मित्रांना बोलावून जबर मारहाण केली. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मध्यस्थीने व अलगद पोहचलेल्या पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टाळला. नाहीतर या हाणामारीत एखाद्याचा जीव धोक्यात आला असता. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. ललित मधू चवरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल अशोक पानघाटे याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर राहुल अशोक पानघाटे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ललित मधू चवरे याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४. ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही गंभीर जख्मा झाल्याने त्यांचे मेडिकल केल्यानंतर राहुल अशोक पानघाटे यास न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्यानी त्याची यवतमाळ कारागृहात रवानगी केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल फिटिंग, जमादार बुरेवार व पोकॉ अमोल नुनेलवार करीत आहे.