दोन दिवसांत चार व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
corona update २५ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहरात कोरोनाची लागण लागण होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले असून प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्येही कमालीची घट झाली आहे. काल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर आज केवळ चार कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७५९ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. दोन दिवसांत आठ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६९० रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी परतले आहेत.
शहर व तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागल्याने रुग्णसंख्याही अतिशय संथ गतीने वाढत आहे. आज ५१ नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर ४७ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ११ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंतचे संपूर्ण तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आज एकाही व्यक्तीचा स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे आरटी पीसीआर तपासणीचे अहवाल अप्राप्त राहिलेले नाहीत. आता पर्यंत तालुक्यात २६१० व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली तर २९१० व्यक्तींची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५९ वर पोहचला असून ६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६८ वर आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १२ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर ३ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये मुकुटबन येथील दोन, गडचांदूर येथील एक तर तेजापूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.