सणासुदीच्या काळात भडकतात आवश्यक वस्तूंच्या किमती

विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तनदिना निमित्त पारंपरिक वस्तूंच्या खरेदीकरिता शहर आज कोरोनाच्या सावटातही नागरिकांच्या गर्दीने फुलून दिसत होते. रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या बाजाराला नागरिकांच्या मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने आणखीच साज चढला होता. हारफुलांबरोबरच तोरण पताका, मिठाई, प्रसाद, घेणाऱ्यांची लगबगही दुकानदारांचा हात रिकामा राहू देत नव्हती. सण उत्सवांच्या या काळात नागरिकांचा उस्ताह व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक जण पारंपरिक पूजेकरिता लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याच्या लगबगीत दिसत होता. आजचा दिवस गाजवला तो फुलहार विक्रेत्यांनी. हारांच्या किमती आज दुपटीने वाढल्या होत्या तर फुलांचे भाव गगनाला भिडले होते. सायंकाळ होता होता फुलांचा तुटवडाही निर्माण झाला होता. आजच्या दिवशी सायकल पासून तर जड वाहनांपर्यंत सर्वच लोखंडी वस्तुंना धून पुसून हारे फुले वाहण्यात येतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी फुल हारांना विशेष महत्व प्राप्त होत असते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही ठिकठिकाणी साजरा होत असल्याने फुल हारांना विशेष मागणी असते. हीच संधी कॅश करण्याच्या हेतूने सणासुदीच्या काळात आवश्यक वस्तूंच्या भरमसाठ किंमती वाढविण्यात येतात. आज फुलं खरेदी करतांना नागरिकांच्या अंगावर काटे येत होते. हारांच्या किमती ऐकून कानांवर विश्वास बसत नव्हता. सण उत्सवात मागणी असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढविण्याची जणू प्रथाच झाली आहे. लॉकडाऊन काळात नैराश्य आलेल्यांना सणासुदीच्या काळातील आनंदही वस्तूंच्या वाढणाऱ्या किमतींमुळे पूर्णपणे उपभोगता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दसरा दिवाळी हे मोठे सण असल्याने सामान्य माणूसही परिवारासह हे महत्वाचे सण आनंदात साजरे करण्यास धडपडत असतो. पण नेमके सणांना हेरूनच आवश्यक वस्तूंच्या किमती वाढविण्यात येत असल्याने नाईलाजास्तव सामान्यांना आपल्या आनंदावर पाणी सोडावे लागत असल्याचे प्रत्येक वेळीच पाहायला मिळते. तेंव्हा सणासुदीच्या काळात वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. नाही तर प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळीही सामान्यांना दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद मानून डोळ्याचे पारणेच फेडावे लागतील.