६४ वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा साध्या पद्धतीने साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन व तक्षशिला महिला मंडळ विठ्ठलवाडी यांच्या विद्यमाने ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी १४ ऑक्टोबर १९५६ च्या ऐतिहासिक धम्म दिक्षा सोहळ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विठ्ठलवाडी येथील बुद्ध विहारात तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना कांबळे यांच्या मार्गदर्शनात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा घेण्यात आला तर रेल्वे स्टेशन येथे आजी माजी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडविलेली धम्मक्रांती निरंतर स्मरणात रहावी म्हणून दरवर्षी देशात ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी देशात कोरोनाचे संकट आल्याने प्रत्येकचं उत्सव सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्याचे शासनाचे आदेश असल्याने धम्मचक्र प्रवर्तनदिनही साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात आला.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ सेवानिवृत्त व विद्यमान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मागील ३५ वर्षांपासून नित्य नियमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध या महामानवांच्या जयंत्या, महापरिनिर्वाणदिन, धम्मचक्र प्रवर्तनदिन, नामांतरदिन, संविधान दिवस आदी कार्यक्रम साजरे करण्यात येतात. तत्कालीन रेल्वे कर्मचारी सोपान धवन, किसन भगत, विठ्ठल नागराळे, कैलास बोरकर, बबन भगत, पांडुरंग गजभिये बु. कृष्णाजी चंदनखेडे व बु. मुकिंदा गरपाल यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन येथे पंचशील झेंडा बसविण्यात आला. यांच्याच धम्मकार्याच्या ओढीतून याठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. आर्थिक जुळवणुकीपासून निघणाऱ्या मिरवणुकीपर्यंत त्यांच्याच योग्य नियोजनाने प्रत्येक धम्मकार्य पार पडायचे. बुद्धभिम गीतांचे कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम, कव्वाली, मनोरंजनात्मक कार्यक्रम, वऱ्हाडी हास्य कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम त्यांच्या कार्यकाळात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडायचे. कार्यक्रमांच्या आयोजनापासून तर नियोजनापर्यंतची सर्व जबाबदारी कुशलतापूर्वक पार पाडण्यात ते तरबेज होते. त्यांच्या कार्यकाळात बुद्ध भीम जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने रेल्वे स्टेशनची शहरात वेगळीच ख्याती निर्माण झाली होती. कालांतराने ही रेल्वे कर्मचाऱ्यांची सशक्त टीम सेवानिवृत्त झाली व धम्मकार्याची धुरा तरुण पिढीकडे सोपऊन ते मार्गदर्शनाचे काम करू लागले. त्यांच्या धम्मकार्याची प्रेरणा घेऊन तरुणांनी जयंती उत्सव समितीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व ती पुढे नेण्याचा पुरेपूर प्रत्नही केला. पण म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं, तरुणांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा तर घेतली पण त्यांची कार्याप्रती असलेली तळमळ तरुण पिढीने आत्मसात केली नाही. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर एकाही प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन झाले नसले तरी तरुण पिढीने धम्मकार्य थांबू दिलं नाही. बुद्ध भीम जयंतीची मिरवणूक आजही ऐटितच काढली जाते. पण नियोजनाचा अभाव नेहमीच राहिला आहे. विद्यमान रेल्वे कर्मचारी, सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी व तरुण पिढी आपसात सांगड घालून जयंती उत्सव समितीचे सर्वच कार्यक्रम पार पाडत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आजचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदीच साधेपणाने साजरा करण्यात आला.