शहरातील होलसेल व्यापाऱ्याकडे सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाला अटक
सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध लावण्यात आलेले असतानाही होलसेल पान मटेरियल विक्रेत्यांकडून चढ्या भावात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. प्रत्येक पानठेल्यांमधून सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची उघडपणे विक्री करण्यात येत असून होलसेल व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने सुगंधित तंबाखू खरेदी करून पानठेले धारक तंबाखूजन्य पदार्थ अव्वाच्यासव्वा भावात नागरिकांना विकून त्यांची अक्षरशः लूट करीत आहेत. लॉकडाऊन मधून सूट मिळाल्यानंतर तालुक्यातील संपूर्ण पानठेले सुरु झाले आहेत. परंतु नियम व अटींच्या अधीन राहूनच वस्तूंची विक्री करण्याचे आदेश पानठेले धारकांना देण्यात आले आहेत. सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर निर्बंध लावलेले असतांनाही पान मटेरियलचे होलसेल व्यापारी राजरोसपणे पानठेले धारकांना चढ्या भावात सुगंधित तंबाखू विकत आहेत. काल २७ ऑक्टोबरला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील एका होलसेल व्यापाऱ्याचा मालवाहू ऑटोने येणारा सुगंधित तंबाखू जप्त करून ऑटो चालकाला ऑटोसह ताब्यात घेतले आहे.
डीबी पथकाची शहरात गस्त सुरु असताना त्यांना एक मालवाहू ऑटो गुरुनगर परिसरातून सुगंधित तंबाखाची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी जनता हायस्कुल जवळ सापळा रचून जगन्नाथ बाबा मंदिराकडून येणाऱ्या मालवाहू ऑटोला थांबवून ऑटो चालकाची चौकशी केली असता तो गोंधळल्यागत उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी ऑटोची झडती घेतली. त्यात एका पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये आठ पेट्या आढळून आल्या, त्या उघडून पहिल्या असता त्यामध्ये सुगंधित तंबाखाचे २०० ग्रामचे ३२० डब्बे आढळले. प्रत्येक डब्यावर ७५५ रुपये किंमत लिहिलेली होती. तसेच ड्रायव्हरने कोरोनाची साथ सुरु असताना तोंडाला मास्क सुद्धा बांधले नव्हते. पोलिसांनी ऑटो चालक राजू नारायण येमूलवार (३०) रा. सुभाष चौक याला अटक करून त्याच्याकडून २ लाख ४१ हजार ६०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाकू व वाहतुकीकरिता वापरलेला ऑटो क्रं MH २९ ६८४३ अंदाजे किंमत ५० हजार रुपये असा एकूण २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर भादंवि च्या कलम १८८,२६९,२७०,२७१,२७२,२७३,३२३ सहकलम १३०/१७७ मपोका नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ऑटो चालकाला सुगंधित तंबाखू कुणाकडे पोहचता करणार असल्याबाबत विचारले असता त्याने सनी उर्फ कुशल गिरीधरभाई पटेल (३४) रा. वणी याचे नाव घेतल्याने पोलिसांनी त्याच्यावरही कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. डीबी पथकाने बेकायदेशीररीत्या शहरात विक्रीकरिता आणल्या जाणारा लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडल्याने छुप्या पद्धतीने सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या होलसेल विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोउपनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली आहे.