महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
मद्यधुंद युवकाने महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोकुल नगर येथील युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गोकुल नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच मोहल्ल्यातील राजू शिंदे (३५) यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गोकुलनगर येथे राहणारी २० वर्षीय महिला ३ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घरच्या अंगणात मुलाला खेळवत होती. गवंडी काम करणारा महिलेचा पती रोजंदारीच्या कामाला गेला होता. दरम्यान मद्यधुंद अवस्थेत राजू शिंदे महिलेजवळ आला व तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी अंगलट करीत असतानाच तिने विरोध केल्याने त्याने तिला जोराचा धक्का देत जमिनीवर पाडले. व तेथून पळ काढला. जमिनीवर पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली. नंतर तिचा पती कामावरून परतला असता तिने त्याला आपबिती सांगितली. तो जाब विचारण्याकरिता राजुच्या घराकडे जात असतानाच राजू रस्त्यात गवसला व कोणतीही क्षमा याचना न करता उलट महिलेच्या पतीलाच जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे भयभीत झालेल्या पती पत्नीने पोलीस स्टेशन गाठून राजू शिंदे विरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रार नोंदविली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू शिंदे याला अटक करून त्याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३५४(अ), ३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस जमादार बुर्रेवार करीत आहे.