पोलिसांनी तीन दुचाकी चोरट्यांना केली अटक, चार दुचाक्या केल्या जप्त !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिक चिंतेत आले असतानाच पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा कसून शोध घेत तीन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाक्या जप्त केल्या आहेत. चोरी प्रकरणाचा जलद छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नेहमी तत्पर राहिलेल्या डीबी पथकाच्या धडक कार्यवाहीने गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली आहे. उभ्या असलेल्या दुचाक्यांवर नजर ठेऊन त्या चलाखीने लंपास करणाऱ्या शहरातील एका परप्रांतीय आरोपीस पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तीन दुचाक्या जप्त केल्या तर नागपूर येथे अटक केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून एक दुचाकी अशा एकूण चार दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तालुक्यातील वेगांव येथील मनोज तुळशीराम धगडी (३७) यांची डोंगरगाव शेत शिवारात उभी असलेली दुचाकी क्रं MH ३४ BA ६९६६ चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी ३ नोव्हेबरला पोलीस स्टेशनला नोंदविली. दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्याची ओरड होऊ लागल्याने डीबी पथकाने दुचाकी चोरट्यांचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. ४ नोव्हेंबरला खडबडा मोहल्ल्यात सदर क्रमांकाची दुचाकी आढळल्याची गुप्त माहिती मिळताच डीबी पथकाने खडबडा मोहल्ला गाठत चोरीची दुचाकी बाळगणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ चोरीच्या आणखी दोन दुचाक्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपी चंदन सदन चौधरी (४०) रा. खैरा चाखणी ता. सेमरी जी. बक्सर या खडबडा मोहल्ल्यात राहणाऱ्या परप्रांतीय आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या तीन दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावर भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच भीमनगर येथील संजय रामभाऊ भगत यांची आरोग्य विभागाच्या गेट जवळ उभी असलेली दुचाकी क्रं MH २९ AH १८७६ चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली होती. सदर दुचाकी नागपूर येथे आढळून आल्याने दुचाकी चोरट्यांना नागपूर कारागृहातून ताब्यात घेऊन फेर कार्यवाही करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद अनिस मोहम्मद रईस (३०) रा. गजानन आटाचक्कीजवळ संघर्ष नगर वाठोडा, सुरज बलवीर सिंग (१९) रा. पारडी भवानी मंदिर नागपूर यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथकाचे पोऊपनि गोपाल जाधव, पोहवा सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पोकॉ. पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार यांनी केली.