वणी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शेतीची मशागत कशी करायची व कपाशीच्या रोगांवर ट्रायक्रोग्रामा पद्धतीने नियंत्रण कसे मिळवायचे यावर मार्गदर्शन करण्याकरिता स्थानिक कुणबी भवनात शेतकरी मार्गदर्शन शाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वणी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मार्गदर्शन शाळेत कपाशीवरील बोन्ड अळीच्या प्रादुर्भावाला मित्र कीटकांची संख्या वाढवून ट्रायक्रोग्रामा पद्धतीने नियंत्रण मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांना नेहमीच आसमानी व सुलतानी संकटाना सामोरं जावं लागतं. यावर्षी तर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागले. लॉकडाऊनमुळे कास्तकारांची चांगलीच वाताहत झाली. वाहन व मजुरांअभावी शेतमाल शेतातच सडल्याने उभ्या पिकावर कास्तकारांना नागर फिरवावा लागला. तर काही कास्तकारांच्या शेतमालांना बाजारपेठ मिळू न शकल्याने त्यांना शेतमाल फेकावा लागला. कापूस कित्येक दिवस शेतकऱ्यांच्या घरात पडून राहिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कापूस खरेदीचा बिगुल वाजला. पण सीसीआयच्या कापूस खरेदीतही नोंदणी पासून तर कापूस विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ग्रेडरनी शेतकऱ्यांच्या कापसाऐवजी व्यापाऱ्यांच्या कापूस खरेदीला प्राधान्य दिल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. यातून सावरत शेतकरी शेतीच्या नव्या हंगामाच्या तयारीला लागला. नव्या उमेदीने शेतीच्या मशागतीत लिन झाला. पण संकटं बळीराजाच्या पाचवीलाच पुजली आहेत. पीक कर्जाकरिता बँकेचे उंबरठे झिजवितांना त्यांच्या पायाला भिंगऱ्या आल्यात. ऑनलाईन कामे नेटवर्क अभावी रखडली गेली. बियाण्यांचा तुटवडा दाखवून दाम दुपटीने बियाण्यांची विक्री करण्यात आली. बियाण्यांच्या किमती पाहून शेतकऱ्यांना भोवळ यायला लागली. काहींनी कसबसं बियाणं खरेदी केलं. पण काही शेतकऱ्यांचं बियाणं उगवलंच नाही. बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारल्या गेलं. पेरलं एक पायली व उगवलं शेरभर अशी स्थिती निर्माण झाली. युरिया खतांसाठीही शेतकऱ्यांना चांगलीच पायपीट करावी लागली. रॅक पॉईंट अभावी कित्येक दिवस शेतकऱ्यांना युरिया खत मिळू शकलं नाही. पीक उभं झालं तरी पिकांना खत देता न आल्याने शेतकरी चिंतातुर झाला. नंतर परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. हातातोंडाशी आलेलं शेतपिक परतीच्या पावसाने नासवून टाकलं. कपाशीची बोन्ड काळवंडली, तुटून पडली, सोयाबीनचा पार मातेरा झाला. सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटू लागली. शेंगा गळून पडल्या. नगद पीक म्हणून पिकविलेला कापूस नाहीच्या बरोबर झाला. या संकटातून सावरत नाही तोच बोन्ड अळीने कपाशीवर आक्रमण केले. कापसावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यातच कापूस वेचणीला मजूर शोधतांना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर गावी परतल्याने मजुरांची वानवा झाली. गावोगावी जाऊन मजूर शोधतांना शेतकरी अक्षरशः रडकुंडीस आला. अशी अनेक संकटं पेलताना काहींचा तोल सुटला व त्यांनी टोकाचे निर्णय घेतले. अशा या संकटांनी पोळलेल्या शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढविण्या करिता शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. शेतकऱ्यांत नवी उम्मीद जागवून त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या कार्यशाळा आयोजनामागचा हेतू होता. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना तज्ञानकडून कृषीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. संकटांनी खचून न जाता संकटाना सामोरे जाण्याची जिद्द उरी बाळगण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. शेती कसण्याचा वेगवेगळ्या तऱ्हा यावेळी समजावून सांगण्यात आल्या. कार्यशाळेला कृषी अधिकारी सुशांत माने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धम्मपाल बन्सोड, बालाजी धोबे, महेश पाहपळे या कृषीविषयक सल्लागारांव्यतेरिक्त राजू तुरांकर, अजय धोबे, वृषाली प्रवीण खानझोडे, नलिनीताई उरकुडे, सतीश जुनगरी आदी उपस्थित होते.