शहरातील नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये लागली अचानक आग
शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये अचानक लागलेल्या आगीत वर्ग खोल्यांमधील लाकडी व इतर साहित्य जळाल्याची घटना आज रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून यात शाळेचे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नगराध्यक्षांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन शीघ्र अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे शाळेचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आगीच्या चपेट्यात येण्यापासून वाचले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आज रात्री ८ वाजताच्या सुमारास न.प. च्या शाळा क्रं ३ मध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. शाळेच्या पहिल्या दोन वर्ग खोल्यांमध्ये आग भडकल्याने त्यातील लाकडी व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. शाळा आगीच्या ज्वाळांनी धुमसत असताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रसंगावधान राखत अतिशीघ्र अग्निशमन दलाला पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेचे अतिमहत्वपूर्ण दस्ताऐवज व रेकॉर्ड आगीत भस्मसात होण्यापासून वाचले. नगराध्यक्षांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन समयसूचकता दाखविल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. नाहीतर शाळेच्या रेकॉर्ड रूम पर्यंत आग पोहचून महत्वपूर्ण दस्तऐवज जाळून खाक झाले असते. शाळेच्या पहिल्या दोन वर्ग खोल्यांमधील लाकडी व इतर साहित्य जळाल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा नशेखोरांचा नशा करण्याचा अड्डा बनल्या आहेत. रात्रीच्या वेळेला नशेखोर युवकांचे टोळके सिगारेट गांज्याचे झुरके घेत बंद शाळेच्या आवारात बसले असतात. शाळेचा आढोसा घेत नशाखोरांच्या मैफिलीही रंगत असल्याचे पाहायला मिळते. बंद शाळांना नशा व जुगार खेळण्याचे अड्डे बनविले आहेत. विद्यार्जनाच्या ठिकाणी मद्यार्जन करण्यात येत असल्याने शाळेची प्रतिमा डागाळली जात असून शाळेचं पावित्र्य धोक्यात आणणाऱ्या या नशेखोरांना अद्दल घडविणे आता गरजेचे झाले आहे. बंद शाळांची निगराणी करण्याकरिता कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात न आल्याने या नशेखोर युवकांना रान मोकळे झाले आहे. नशा करण्याकरिता हक्काची जागा मिळाल्यागत अपप्रवृतीचे युवक बंद शाळांमध्ये मेजवान्या करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. गांज्या सिगारेटचे झुरके घेतांना अधर्वट जळालेल्या सिगारेट लापर्वाहीने कुठेही फेकल्या जात असल्याने आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.