बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते प्रविण खानझोडे यांची निवड
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते प्रविण खानझोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. स्थानिक विश्रामगृहात घेण्यात आलेल्या समाजबांधवांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. समाजकार्यात तत्पर असलेले तथा सामाजिक प्रश्न उचलून धरतानाच सामाजिक संघटनांची बांधणी करण्यात नेहमी प्रयत्नशील असणारे प्रविण खानझोडे यांचे समाजकार्य वखाण्याजोगे आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितून उभारी घेत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करतानाच समाजकार्याचा ध्यास जोपासत नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याचं कार्य त्यांनी अविरत सुरु ठेवलं. विद्यार्थी जीवनापासून समाजकार्यात लिन असलेल्या या ध्येयवेड्या युवकाने परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःला सिद्ध करतानाच वेगवेगळ्या समाजातील युवकांना संघटित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करीत संघटन बळकट करण्यावर नेहमी भर दिला. राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही त्यांनी समाजकार्याला प्राथमिकता दिली. राजकीय क्षेत्रात वावरतानाही त्यांनी नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यावरच भर दिला. विविध समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन संघटन उभारणीचे कार्य त्यांनी हाती घेतले व आजही ते यशस्वीपने पार पाडत आहे. बारा बलुतेदार समाज समाज हा हजारो वर्षांपासून आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. स्वनिर्मित वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या या समाजाच्या समस्या वाढत चालल्या आहेत. या समाजाचे केंद्र व राज्य स्तरावर खंडीभर पुढारी आहेत. पण निवेदने देण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे आता निवेदने देऊन चालणार नाही तर समाजाचे संघटन बळकट करून सामाजिक नाय हक्कासाठी आवाज बुलंद करावा लागणार आहे. बारा बलुतेदार समाज हा आजही असंघटित असून हा समाज संघटित झाल्याशिवाय या समाजाचं उत्थान होणार नाही. या जाणिवेतून बाराबलुतेदार समाजातील काही व्यक्तींनी एकत्रित येत संगठन बांधणीचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे. या कार्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते प्रविण खानझोडे यांच्यावर सोपविली आहे. बारा बलुतेदार समाज बांधवांच्या या बैठकीत प्रविण खानझोडे यांची एकमताने कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत बारा बलुतेदार समाजाचे गावनिहाय संघटन मजबूत करून समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीला वणी मारेगाव व झारी येथील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.