विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने १३ वर्षीय पाहुणा मुलगा जळाला !
तालुक्यातील वागदरा येथे घराची रंगरंगोटी करीत असलेल्या एका १३ वर्षीय मुलाला विद्युत वाहिनीच्या तारांचा करंट लागल्याने तो ९० टक्के जळाला असून अतिगंभीर अवस्थेत त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये घरांची रंगरंगोटी व सजावट करण्याची लगबग सुरु असून दिवाळी अगदी तोंडावर आल्याने जिकडे तिकडेच घराची रंगरंगोटी करणे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वागदरा येथील गणेश राजगडकर यांच्या घरीही दिवाळी जवळ आल्याने घराची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु होते. शास्त्री नगर येथील कलर पेंटिंग करणाऱ्याना घराच्या पेंटिंगचा हुंडा देण्यात आला. पेंटिंग करणाऱ्यांच्या घरी आलेला पाहुणा घरी करमत नसल्याने सहज त्यांच्या सोबत कामाच्या ठिकाणी आला. घराच्या छतावरून पेंटिंग मारणे सुरु असताना पाहुणा मुलगा रंगाची बालटी देण्याकरिता छतावर चढला असता त्याचा हाताचा स्पर्श घरावरून जाणाऱ्या ३६ केव्ही लक्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या तारांना झाला. त्यात तो ९० टक्के भाजल्या गेला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी चंद्रपूर रेफर करण्याचा सल्ला दिल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरला रेफर करण्यात आले आहे. समीर मेश्राम वय १३ वर्ष असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. दिवाळी निमित्त पाहुणा म्हणून आलेल्या मुलावर असा दुर्दैवी प्रसंग ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. करंट एवढा जोरदार होता की, आजूबाजूच्या घरातील इलेकट्रीकल साहित्य क्षतिग्रस्त झाले. काही जणांच्या टीव्ही जळाल्याने त्यांचेही फारमोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.