तालुक्यात आढळले आज कोरोनाचे १२ रुग्ण
corona update ११ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात थंडी वाढू लागल्याने कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. थंड वातावरण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिकूल ठरत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात आज १२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५६ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ वर पोहचली आहे. आज आणखी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात वाढत्या थंडी बरोबरच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ४० व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून ९ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३१ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ३ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १८ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या आहेत. आज आणखी १४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १८ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. तालुक्यात आज १२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५६ झाली असून ७८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ३३ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सुकणेगाव येथील दोन, चिखलगाव एक, लोकमान्य टिळक कॉलेजच्या मागील परिसरातील तीन, हिरानी ले-आऊट येथील दोन, सदाशिव नगर एक, विठ्ठलवाडी एक तर पोस्ट कॉलनी येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. विठ्ठलवाडी परिसरात आता पर्यंत २८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.