दिव्यांची आऱ्हास घेऊन आली दिवाळी
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
दिव्यांची आऱ्हास घेऊन दिवाळीचे आगमन झाल्याने शहर व तालुक्यात आनंदोत्सहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या साहित्यांनी सजलेली बाजारपेठ उत्कंठा वाढवत असून नागरिकांना खरेदी करिता आकर्षित करीत आहे. शहरात दिवाळीची खरेदी जोमात सुरु असून पारंपरिक वस्तूंच्या खरेदीला उधाण आले आहे. दुकानांची करण्यात आलेली सजावट, रंगीबेरंगी लाइटांचे आच्छादन व उत्कृष्ठपणे प्रदर्शनिकरिता लावण्यात आलेल्या वस्तू बाजारपेठेचं सौंदर्य वाढविण्याबरोबरच नागरिकांना खुणावत आहे. दुकानांमधील निरनिराळ्या वस्तू खरेदीरास प्रोत्साहित करीत आहे. नागरिकांनी दिवाळीच्या खरेदी करिता बाजारात एकच गर्दी केल्याने रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे. दुःख नैराश्य बाजूला सारून दिवाळीचा सन आनंदात साजरा करण्याची प्रबळ इच्छाशक्ती उरी बाळगून थोडे थोडके का होईना साहित्य खरेदी करण्यास प्रत्येकाचीच लगबग पाहायला मिळत आहे. उजळत्या दिव्यांच्या पणत्यांनी दुःख नैराश्येचा अंधकार दूर व्हावा ही मनीषा बाळगून प्रत्येक जण दिवाळी साजरी करण्यात लीन झाला आहे. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. बच्चे कंपनीचा अगदी आवडता सण म्हणजे दिवाळी. नवीन कपडे घालून सवंगड्यात मिरविणे, आपलेच कपडे उत्कृष्ठ असल्याचे पटवून सांगणे, वेगवेगळे पदार्थ बनविण्याचा हट्ट करणे हा त्यांचा दिवाळीचा उपक्रम असतो. दिवाळीचे नऊ दिवस बच्चे कंपनीसाठी आनंदाची पर्वणीच असते. नाती गोती, सगे सोयरे, दोस्त मित्र यानिमित्ताने एकत्र येतात. पण या वर्षीच्या दिवाळीच्या सुट्यांचं आकर्षणचं लोप पावलं आहे. शाळा सुरु नसल्याने बच्चे कंपनीही घरीच असून बहुतांश शासकीय कर्मचारीही होमवर्क करीत घरीच बसले आहेत. लांब पाल्याच्या प्रवासी रेल्वे गाड्या पूर्णपणे सुरु न झाल्याने नातेवाईकांकडे जाणेही कठीण होऊन बसले आहे. कोरोनाच्या या काळात परिवारानिशी नातेवाईकांकडे जाणे योग्य वाटत नसल्याने पुष्कळ नातेसंबंधातील व्यक्तींनीही प्रवास टाळला आहे. त्यामुळे बच्चे कंपनीचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
कोरोनाच्या सावटात दिवाळीचा आनंद साजरा करताना परिस्थितीशी जुळवून घेणं एकप्रकारचं आव्हान ठरणार आहे. कोरोनाची साथ अद्यापही निवळली नसून कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळतच आहेत. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही पाळाव्याच लागणार आहेत. कोरोना काळात प्रत्येक सन उत्सव घरीच साधेपणाने साजरे करण्याची वेळ आली. दिवाळी सारखा मोठा सनही साधेपणानेच साजरा करण्याची वेळ या वर्षी आली आहे. साधेपणाने का होईना दिवाळीचा सन आनंदात साजरा करण्याकरिता नागरिक तयारीला लागले आहेत. लॉकडाऊन काळात आलेलं नैराश्य झटकून परिवारासमेत दिवाळीचा आनंद साजरा करण्याकरिता दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यास कुटुंब प्रमुखांनी पुढाकार घेतला आहे. घर अंगणात दीप उजळून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट दाखविणारा सन म्हणून दिवाळी साजरी करण्यात येते. जीवनातील अंधकार दूर करण्याची आराधना दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येते. एकमेकांच्या शुभेच्छानी एकमेकांच्या जीवनात भरभराट यावी, हिच या दिवाळीच्या निमित्ताने मनोकामना असायला हवी.