रंगनाथ नगर येथे काचेच्या शिशीने वार करून शेजाऱ्याला केले जख्मी

शुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात एकाने दुसऱ्याच्या मानेवर काचेच्या शिशीने मारून जख्मी केल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास रंगनाथ नगर येथे घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक रंगनाथ नगर येथे एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये अतिशय शुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकाने दुसऱ्याच्या मानेवर काचेच्या शिशीने वार करून जख्मी केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिल महादेव उरकुडे (४७) व हरिशचंद्र वाढई (६५) हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने हरिश्चंद्र वाढई यांचा परिवार अनिल उरकुडे यांच्या घरी गेला होता. मुलगा रडत असल्याने अनिल उरकुडे त्याला घरी सोडण्याकरिता गेले असता वाढई याने मुलाला का आणले म्हणून वाद घालत उरकुडे याच्यावर धारदार काचेने हल्ला चढवला. काचेचे घाव मानेवर बसल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी हा दारूचा व्यसनी असल्याचे समजते. याबाबत अनिल उरकुडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरिशचंद्र वाढई याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार बुरेवार करीत आहे.