WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

फिरत्या पाणी विक्रीच्या वाहनांवर लावलेल्या ध्वनिक्षेपणामधून वाजविली जातात मोठ्या आवाजात गाणी !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरात फिरत्या पाणी विक्रीला उधाण आले असून अनेक मोबाईल वाहनांमधून गल्लीबोळात पाणी विक्री करण्यात येत आहे. दिवस उजाडल्यापासून शहरात पाणी विक्रीची वाहने फिरू लागतात. पाणी विक्रीच्या प्रत्येक वाहनाला ध्वनीक्षेपण बसविण्यात आले आहे. सकाळ पासून तर सायंकाळ पर्यंत या ध्वनिक्षेपणांमधून निरनिराळ्या प्रकारची गाणी वाजविली जातात. मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ही कर्णकर्कश गाणी वाजविल्या जात असल्याने ध्वनी प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण होत आहे. या फिरत्या पाणी विक्रेत्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याबरोबरच मोबाईल वाहनांवर लावण्यात आलेल्या मिनी लाऊड्सस्पिकर मधून वाजणाऱ्या कर्णकर्कश गाण्यांच्या आवाजावर मर्यादा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरात ऑरोच्या पाण्याची मागणी वाढल्याने अनेक मोबाईल गाड्या गल्लीबोळात पाणी विक्रीकरिता धावू लागल्या आहेत. आधी ३० ते ४० रुपयात मिळणारी फिल्टर पाण्याची २० लिटरची कॅन आता १० रुपयात भरून मिळत आहे. काही महिन्यांआधी वाटर एटीएम बसवून पाच रुपयात १० लिटर फिल्टर पाणी भरून देण्याचा अभिनव प्रयोग शहरात करण्यात आला होता. याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर एका वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने फिरत्या वाटर मोबाईल वाहनामधून दारोदारी पाणी पोहचविण्याचा उपक्रम हाती घेतला. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याने अनेकांनी या पाणी विक्रीच्या व्यवसायात उडी घेतली. अनेक मोबाईल गाड्यांमधून गल्लीबोळात पाणी विक्री करण्याला उधाण आले. आता तर या व्यवसायातही स्पर्धा निर्माण झाली आहे. आधी पाणी पाजून पुण्य कामवाल्या जायचे आता पाणी विकून पुंजी जमविण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. फिल्टर वॉटरच्या नावाखाली काहींनी थंड पाणी विकण्याचाही सपाटा लावला आहे. १० रुपयात २० लिटर पाणी भरून मिळत असल्याने भारावलेल्या नागरिकांनी नळाचे पाणी पिणेच बंद केले असून पाणी विक्रीच्या गाड्यांची ते दररोज चातकासारखी वाट बघत असतात. फिल्टर वॉटर असल्याचे सांगत कुलिंग वॉटर दिल्या जात असतानाही नागरिक अनभिज्ञ आहेत. आधी मोजकेच ऑरो प्लांट असल्याने विश्वासाहर्ता जपली जायची. आता जो तो पाणी विक्रीच्या व्यवसायात उतरल्याने विश्वासाहर्ता लोप पावली आहे. १० रुपयात २० लिटर चिल्ड फिल्टर पाणी मिळत असल्याची नागरिकांची समज झाल्याने त्यांनी या पाण्याला पसंती दर्शविल्याने शहरात फिरत्या पाणी विक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. फिरत्या पाणी विक्रीच्या मोबाईल वाहनांवर मिनी लाऊड्सस्पीकर लावण्यात आले आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत भक्ती गीतांपासून तर फिल्मी गीतांपर्यंत निरनिराळी गाणी मोठ्या आवाजात वाजविली जातात. या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांची झोप मोड होण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय येत आहे. भल्या पहाटे मोठ्या आवाजात गाणी वाजविली जातात. दोन पाणी विक्रीची वाहने एकत्र आल्यानंतर भक्ती गीतात फिल्मी गीत मिसळून मोठा कल्लोळ निर्माण होतो. कधी कधी त्यांच्या या सुरात नगर पालिकेच्या घन्टा गाडीचा सूर मिसळत असल्याने सर्वत्र कल्लोळच कल्लोळ ऐकायला मिळतो. मोठ्या आवाजात गाणी वाजविल्या जात असल्यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असून गाण्याच्या आवाजांवर मर्यादा लावण्याची मागणी जोर धरत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share