WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रेती तस्करांवर शिरपूर पोलिसांची मोठी कार्यवाही

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

टाळेबंदीचा काळ अवैध धंदेवाल्यांकरिता सुकाळ ठरला आहे. याकाळात अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावले असून अवैध धंद्यांमधून बरीच उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. तस्करांसाठी तर टाळेबंदीचा काळ पर्वणीच ठरला आहे. दारू तस्करी बरोबरच रेती तस्करीही चांगलीच फोफावल्याचे पाहायला मिळाले. रेती तस्करीच्या या गोरख धंद्यात राजकीय क्षेत्रातील लोकांबरोबरच अप प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात उतरले असून तस्करीच्या माध्यमातून त्यांनी चांगलीच माया जमविल्याचे समजते. राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा व प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिलीभगत तस्करीला सुगीचे दिवस आणण्यास कारणीभूत ठरली आहे. तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले असतानाच आज शिरपूर पोलिसांनी सापळा रचून अवैध रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालकांवर गुन्हे दाखल केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सदर रेतीचे ट्रक एका प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याचे समजते. २१ नोव्हेंबरला सकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास ही कार्यवाही करण्यात आली.

पैनगंगा नदीतून अवैध उत्खनन करून रेतीची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी सापळा रचून तीन अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली. महालक्ष्मी कॅम्प जवळील पैनगंगा नदीतून अवैध उत्खनन करीत रेती भरलेले तीन ट्रक शिरपूरकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने शिरपूर पोलिसांनी सापळा रचून साईजिनिंग शिंदोला येथून MH २९ BG ७८९३ तर अभई फाटा येथून MH २४ AB ७७१३ व MH २९ BE ७४७४ हे तीन ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक तैरास सिमून बडा (५३) रा. हनुमान नगर, शेख मुर्तजा मोहम्मद हनीफ (४३) रा. मुकुटबन, अमोल नंदू मेश्राम (२४) रा. मोहदा यांना अटक केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन हायवा ट्रक अंदाजे किंमत ४२ लाख रुपये व १६ ब्रास रेती अंदाजे किंमत ८० हजार रुपये असा एकून ४२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर पोलिसांच्या या धडक कार्यवाहीने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून तस्करी वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, पीएसआय ज्ञानेश्वर धावळे, एस.सी. गावंडे, एनपीसी कोशटवार, पीसी अमित पाटील यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share