तालुक्यातील आणखी पाच व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
corona update २३ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला असला तरी प्रातिदिन कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णांची संख्या वाढतीवरच आहे. तालुक्यात आज कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची ९३९ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५ वर पोहचली आहे. आज आणखी तीन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यापासून बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यानंतर शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोनाची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले. तसेच शिक्षण विभागाने जरी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आल्याने तालुक्यातील ५७० शोक्षकांनी कोरोनाच्या तपासण्या करून घेतल्या. त्यामध्ये २३ शिक्षक पॉझिटिव्ह आले तर ३९५ शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १५२ शिक्षकांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शिक्षकच पॉझिटिव्ह आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये धास्ती भरली असून पालकांनी संमती देण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची शासनाने अनुमती दिली असली तरी परिस्थितीनुरूप स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शाळा खुल्या करण्यात आल्या तरी विद्यार्थ्यांनी उपस्थिती न दर्शविल्याने शाळेमध्ये शुकशुकाट दिसून आला.
तालुक्यातील ६५ व्यक्तींच्या आज रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून ५ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ६० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज एकही तपासणी अहवाल प्राप्त झाला नसून आज आणखी २४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १५९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत. ७५ सक्रिय रुग्णांपैकी ४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १९ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये पद्मावती नगरी येथील एक, रवीनगर एक, बोरगाव एक, चोपण एक तर घुग्गुस येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची नागरिकांनी दक्षता घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.