WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील अनियंत्रित वाहतुकीमुळे निर्माण झाली वाहतुकीची समस्या

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरात वाहतुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली असून अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेशिस्तपणे वाहने चालविली जात असल्याने शहराला अगदीच बकाल रूप आले आहे. वाहतूक नियंत्रणाकरिता प्रमुख चौकांमध्ये उभे असलेले वाहतूक पोलीस गप्पा गोष्टीतच दंग रहात असल्याचे पाहायला मिळते. डोळ्यासमोर वाहनांचा जाम लागत असतानाही ते बघ्यांची भूमिका घेतात. रस्त्यावर वाहने उभी करून गप्पा हाकणाऱ्या वाहन चालकांना हटकण्याचे सौजन्यही ते दाखविताना दिसत नाही. वाहतुकीची समस्या गंभीर वळण घेऊ लागली असतांनाही वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून वाहतूक पोलीस सावज शोधण्यातच गुंग रहात असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये बुडालेल्या महसूलाची पोकळी भरून काढण्याच्या नादात वाहतूक पोलीस अनियंत्रित वाहतुकीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत.

शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे वाहन चालक बेशिस्त झाले आहेत. शहरातील वाहतूक पूर्णतः अनियंत्रित झाली असून दुचाकि वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आडवी तिडवी वाहने चालविली जात असल्याने दुचाक्या एकमेकांना धडकण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. रस्त्यांवर जाम लागणे आता नित्याचेच झाले आहे. रस्त्यांवर येईल अशा प्रकारे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन रस्त्यांवर जाम लागताना दिसत आहे. हाथ ठेले व अन्याविक्रेत्यानी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटल्याने नव्याने विस्तारित केलेले रस्तेही अरुंद वाटू लागले आहे. स्थायिक दुकानदारांनीही रस्त्यावर येईल असे दुकानाबाहेर साहित्य ठेवल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरुणांकडून सुसाट वेगाने चालविण्यात येणारी वाहने व कोणतेही दिशादर्शक न दाखविता अलगद वळण घेणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढीस लागले आहेत. अतिउत्साही तरुणांकडून फुल रेसमध्ये वाहने चालविली जात असल्याने पादचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. महिला मुलींजवळून तीव्र गतीने वाहने नेली जात असल्याने त्यांच्यात असुरक्षितता निर्माण झाली आहे. शहरातील प्रत्येक मुख्य रस्ता व चौकामध्ये अनियंत्रित वाहतुकीमुळे नेहमी जाम लागताना दिसतात. टोलटॅक्स वाचविण्याकरिता घुग्गुस चंद्रपूरकडे जाणारी वाहने शहरातून जात असल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. कापूस विक्रीकरिता जिनिंगमध्ये जाणारी वाहने शहरातूनच मोठ्या प्रमाणात जाताना दिसतात. एवढेच नाही तर मेटॅडोर ट्रक पासून तर ट्रेलर पर्यंतची वाहने टोलटॅक्स वाचविण्याकरिता पंचशीलनगर मार्गे शहरातून जात असल्याने या मार्गाने वाहतुकीचा नेहमी खोळंबा होताना दिसतो. वाहतूक पोलीस शहरातील वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी वणी चंद्रपूर राज्य महामार्गावर गस्त घालताना दिसतात. राज्य महामार्गावरील वाहतुकीला नियंत्रणात ठेवतानाच शहरातील अनियंत्रत वाहतुकीकडेही लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे. अनियंत्रित वाहतूक, रस्त्याच्या कडेला थाटण्यात आलेली दुकाने व रस्त्यावर येईल अशा पद्धतीने उभी करण्यात आलेली वाहने यामुळे शहरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून शहराला अगदीच बकाल रूप आले आहे. बेशिस्तपने वाहने चालविण्याने एखादा गंभीर अपघात झाल्यास नवल वाटू नये. शहरातील वाहतुकीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून वाहतूक विभागाने वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता योग्य पाऊले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share