संविधानदिना निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आली बाईक रॅली
संविधादिना निमित्त शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शहरातील प्रत्येक बुध्दविहार व पंचशीलध्वज परिसराला या रॅलीने भेटी देऊन त्याठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. देशाची एकात्मता व अखंडता आभादीत राखण्यात संविधानाचं मोलाचं योगदान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिलेल्या संविधानामुळेच देशाचं सार्वभोमत्व टिकून राहील आहे. प्रत्येकाला समानतेचा अधिकार बहाल करतानाच अधिकाराची जोपासना करण्याचं कार्य संविधानाने केलं आहे. सर्वांनीच संविधानाप्रती एकनिष्ठ राहून संवैधानिक मार्गानेच वाटचाल करण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करण्यात आली. २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेऊन लिहिलेलं संविधान देशाला समर्पित केल्याच्या ऐतिहासिक क्षणाला आज ७१ वर्ष पूर्ण झाले. ७१ व्या संविधानदिना निमित्त शहरात ठीकठिकाणी संविधानदिन समारंभाचे आयोजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच संविधानाप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. संविधानदिनाचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वणी विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील प्रत्येक परिसरातील बुध्दविहार व पंचशील झेंड्याना भेटी देत ही रॅली रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ आली असता या ठिकाणी आयोजित संविधान समारंभात या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी द्वारा पंचशील झेंड्याजवळ संविधान समारंभाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदना घेण्यात आली. रॅलीचे याठिकाणी आगमन होताच रॅलीतील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंगल तेलंग यांच्या मार्गदर्शनात जीवने यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बहादूरे, किशोर मुन, बंडू गणवीर, विनोद गजभिये, प्रामुख्याने उपस्थित होते. रेल्वे स्टेशन परिसरातून या रॅलीने विठ्ठलवाडी येथील बुद्ध विहाराकडे प्रस्थान केले. त्याठिकाणी तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना कांबळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या संविधान समारंभात रॅलीचे स्वागत करण्यात येऊन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समितीच्या अध्यक्षा शोभा भगत, सचिव रजनी चंदनखेडे, मंजुळा पाटील, माया चंदनखेडे, इंदू पळवेकर, अनिल भगत, राहुल चंदनखेडे, आकाश बोरकर, वैभव गजभिये, अरुण चंदनखेडे, किसन भगत, रमेश पाटील आदींनी सहकार्य केले. वंचित बहुजन आघाडी तर्फे काढण्यात आलेली ही बाईक रॅली प्रत्येक बुद्ध विहार व पंचशील झेंडा परिसराला भेट देत सम्राट अशोक नगर बुद्ध विहारात पोहचल्यानंतर या रॅलीचे समापन करण्यात आले.