दोन युवकांच्या आत्महत्यांनी तालुका हादरला
तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरूच असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. आत्महत्यांचं दुश्चक्र थांबण्याचं नाव घेत नसून मृत्यूला अगदी सहजपणे कवटाळलं जात आहे. संकटांना तोंड देण्याची क्षमता न उरल्याने परिस्थिती समोर लोटांगण घालीत युवावर्ग मरणाला जवळ करीत आहे. जीवनात आलेलं अपयश किंवा चुकलेले निर्णय पचवता न आल्याने युवक आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही जीवन सार्थकी न लागल्याने नैराशेच्या गर्तेत आलेला युवावर्ग जीवनाचाच त्याग करू लागला आहे. काल २६ नोव्हेंबरला दोन नव्या उम्मेदीच्या युवकांनी नाउम्मेद होऊन जीवन यात्रा संपवली. तालुक्यातील राजूर येथील वार्ड क्रं ३ मध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाने व शहरातील रंगारीपुरा येथील ३० वर्षीय युवकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने ते रहात असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. राजूर येथील युवकाचा २९ नोव्हेंबरला विवाह होणार होता. दोन युवकांच्या या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यात सुरु असलेले आत्महत्यांचे सत्र संपता संपत नाही. जीवन नकोसे झाल्यागत युवक आत्महत्या करीत असल्याने युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता लोप पावत चालल्याने युवावर्ग मानसिक खच्चीकरणातून आत्महत्ये सारखे पर्याय निवडत आहे. दोन दिवसानंतर विवाह बंधनात अडकणार असलेल्या राजूर येथील युवकाने हळद लागण्यापूर्वीच गळफास घेतल्याने लग्नघरचा आनंद दुःखात परिवर्तित झाला आहे. अख्खा परिवार लग्नाच्या तयारीत मग्न असताना भावी नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधीच गळफास घेतल्याने लग्नाच्या तयारीत असलेल्या परिवारावर अंत्यविधीचे सोपस्कार पार पडण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढावल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सुनील विजय पाईकराव (२७) असे या तरुणाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत रंगारीपुऱ्यातील स्टेट बॅंकेजवळ राहणाऱ्या आकाश सुरेश मुळे (३०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २६ नोव्हेंबरला रात्री ९.३० वाजता मृतकाचा मित्र त्याला भेटण्याकरिता गेला असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांच्याही आकस्मिक मृत्यूच्या नोंदी केल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहे.