दीर्घ कालावधीनंतर लग्न वरातीत वाजू लागली वाद्य
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने पारंपरिक व्यवसायही बंद पडले. लग्नांच्या वराती, धार्मिक मिरवणुकी व जयंती उत्सवांच्या रॅली काढण्यावर बंदी घातल्याने वाजनतंत्री व्यवसायावर अवकळा आली. मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या वाजनतंत्री व्यवसायावरील बंदी हटल्याने वाद्यांचे आवाज पुन्हा घुमू लागले आहे. लग्नाच्या वरातीत वाद्य वाजू लागल्याने वाद्याच्या तालावर पावले थिरकू लागली आहेत. बँडबाजासह लग्नाच्या वराती निघू लागल्याने वरातीत पूर्वीप्रमाणेच जल्लोष दिसू लागला आहे. कोरोनामुळे उन्हाळ्यातील लग्नाचे बार हुकल्याने शहरात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यार्धापासूनच लग्नाची धामधूम सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. लग्न वरातीची शोभा वाढविणारे बँड बाजेही वरातीत वाजू लागल्याने लग्न वरातीतील मंडळींबरोबरच बघणाऱ्यांनाही आनंदाचे भरते येताना दिसत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आठ महिने वाजनतंत्री व्यवसाय पूर्णतः बंद राहिला. लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर सर्वच व्यवसाय टप्याटप्याने सुरु झाले पण वाद्यांचे आवाज निनादायला तब्बल आठ महिने लागले. कोरोना काळात मिळेल ती कामे करून, वेळप्रसंगी उपासमार सहन करून दिवसं काढलेल्या वाजनतंत्री व्यावसायिकांनी जुना कठीणाईचा काळ विसरून नव्या दमाने वाद्य व्यवसायास सुरुवात केली आहे. लॉकडाऊन काळात कामे नसल्याने हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागलेल्या वादकांना आता कामे मिळू लागल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटले आहेत. लग्न समारंभांचा धडाका सुरु झाल्याने बँड पथकांनाही मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्याने वाद्य व्यावसायिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसानंतर वाद्यांवर हात फिरू लागल्याने वाद्य वाजविणाऱ्यांमध्ये वेगळाच जोश पाहायला मिळत आहे. दीर्घ कालावधीनंतर वाद्याची धून कानी पडू लागल्याने वारातीतील मंडळी बरोबरच बघणाऱ्यांचा उत्साहही शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. अडगळीत पडलेल्या वाद्यांवरील धूळ झटकत वादकांनी वाद्यांमधून धून झंकारण्यास सुरुवात केल्याने वाद्याच्या तालावर पावलेही थिरकू लागली आहेत. आठ महिण्याच्या कालावधीनंतर वरातीत वाद्य वाजविण्याची मुभा मिळाल्याने वादकांमध्येही वेगळाच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.