भालर परिसरात वाघाची दहशत, बैलाला केले ठार तर नागरिकांना झाला साक्षात्कार !
भालर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरु असून या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनाही आता वाघाचे दर्शन होऊ लागल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. शहरातून भालरकडे जाणारा हा मार्ग झाडा झुडपांनी व्यापलेला असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचा संचार पाहायला मिळतो. छोट्या मोठ्या जंगली प्राण्यांबरोबरच आता वाघाचेही दर्शन होऊ लागल्याने भालर परिसरात वास्तव्य करणाऱ्या व या मार्गाने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. ११ डिसेंबरला भालर परिसरातील जंगल शिवारात चरत असलेल्या गुराढोरांच्या कळपावर वाघाने हल्ला चढवून गुराख्या देखत वासराची शिकार केल्याने गुराख्याची बोबडीच वळली आहे. तसेच १० डिसेंबरला भालर येथीलच अशोक राघोबा देठे या शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याने शेतकरीवर्ग कमालीचा धास्तावला आहे. नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याआधी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील भालर परिसरात वाघाचे बस्तान असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून ऐकायला मिळत होती. आता जनावरांची शिकार होऊ लागल्याने व नागरिकांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने भालर परिसरात वाघाचा संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वणी भालर मार्ग हा अनेक छोट्या मोठ्या गावांकडे जाणारा प्रमुख मार्ग असून सुंदरनगर मार्गे घुग्गुसकडे जाणारा हा सोयीचा मार्ग असल्याने या मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जाणे येणे सुरु असते. त्याचबरोबर वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक कार्यालय भालर येथे असल्याने वेकोलि कर्मचाऱ्यांनाही नेहमी या रस्त्याने जाणे येणे करावे लागते. पुष्कळशा खदानींकडे जाणाराही हा प्रमुख मार्ग असल्याने रात्र पाळीतीलही कर्मचाऱ्यांना याच मार्गाने खदानींमध्ये जावे लागते. वाघाचा साक्षात्कार झाल्याचे कळाल्यापासून त्यांच्यात धास्ती निर्माण झाली असून या मार्गाने कर्तव्यावर जाण्यास ते कचरत आहेत. ऐन हंगामात बैलांची शिकार होत असल्याने शेतकरी चिंतेत आला असून वाघाच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यासही धजावत नसल्याचे पाहायला मिळत आहे. वाघाने जनावरांची शिकार केल्या पासून व नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्यापासून भालर परिसरातील नागरिकांमध्ये तसेच या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असून वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.