WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिलेच्या हत्या प्रकरणाचे रहस्य उलगडले, पोलिसांनी अतिशीघ्र तपास करून आरोपीला केले अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

वणी नांदेपरा मार्गावरील रसोया प्रोटिन्स प्रा.ली. कंपनी पासुन काही अंतरावर असलेल्या बडवायीक यांच्या शेत शिवारातिल बंड्या जवळ ११ डिसेंबरला सकाळच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. जया मानोज आवारी (३२) असे या मृत महिलेचे नाव असून ती शहरातील पटवारी कॉलनी येथे किरायाने रहात असल्याचे समजते. १० डिसेंबरला रात्रीच्या सुमारास नातेवाईकाकडे जाण्याचे कारण सांगून घरुन बाहेर पडलेल्या या महिलेचा ११ डिसेंबरला मृतदेहच आढळून आला. अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून तिची निर्घूण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. महिलेला दोन मुले असून ती पती पासुन विभक्त रहात होती.

तालुक्यातील पिंपळगाव येथे माहेर असलेल्या या महिलेचा विवाह वरोरा तालुक्यातील वडोदा येथील मनोज आवारी यांच्या सोबत झाला होता. संरारिक जीवनात खटके उडाल्याने ती दोन मुलांना घेऊन पती पासुन अलग किरायाच्या घरात रहात होती. १० तारखेला रात्रीच्या सुमारास मुलांना नातेवाईकांकडे जात असल्याचे कारण सांगून ती घरा बाहेर पडली. ती खुप वेळ होऊनही घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोधही घेण्यात आल्याचे समजते. ११ डिसेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास बडवायीक यांच्या शेतातील बंड्या जवळ तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. टॅक्सी चालकाने अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संजय सालवटकर (४५) रा. साखरा ता.वरोरा असे या आरोपी प्रियकराचे नाव असून त्याने खून केल्याचे पोलिसांसमक्ष कबूल केले आहे. खून करण्यासाठी वापरलेला लोखंडी रॉडही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. मुलांना शाळेत ने आन करणाऱ्या टॅक्सी चालकासोबत जयाचे प्रेमसंबंध जुळले होते. याची कुणकुण पतीला लागल्याने त्यांच्यात वाद निर्माण होऊन ती एक वर्षांपासून वणी येथे किरायाने रहात होती. दरम्यान प्रियकर संजयनेही तिला प्रतिसाद देणे कमी केल्याने तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. पण १० डिसेंबरला परत त्यांची भेट झाली व हा खुनाचा थरार घडला. शेतमजूर शेतात गेले असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी याबाबत शेत मालकाला माहिती दिल्या नंतर मालकाने पोलिसांना हा गंभीर प्रकार सांगितल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन जागेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदना नंतर पार्थिव कुटूबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांनी आरोपी संजय सालवटकर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून या हत्या प्रकरणाचा अती जलद छडा लावला. घटनेचे मुळ शोधण्याकरीता पोलिसांनी विविध अँगलने तपास सुरु केला. प्रत्येक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून हे प्रेम प्रकरण समोर आल्याने पोलिसांनी प्रियकर संजय सालवटकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबंधातून महिलेला आपला जीव गमवावा लागला. मायेचे छत्र हरपल्याने मुले पोरकी झाली. प्रेमसंबंधाने सांसारिक जीवन उध्वस्त होऊन संसार चव्हाट्यावर आला. एवढेच नाही तर या अनैतिक संबंधातून तिचा नाहक बळी गेला.

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, एपीआय माया चाटसे यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन अति जलद या हत्या प्रकरणाचा छडा लावला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share