तालुक्यात मागील तीन दिवसांत आढळले ३० कोरोना बाधित रुग्ण
corona update १२ Dec.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पॉझिटीव्ह रुग्ण आढळतच असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती अद्यापही कायम आहे. मागील तीन दिवसांत ३० कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०३२ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण वाढून ५९ झाले आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांत वाढ झाली असून दोन दिवसांत तब्बल कोरोनाचे २८ रुग्ण आढळले आहेत. १० डिसेंबरला दोन, ११ डिसेंबरला १४ तर १२ डिसेंबरला आणखी १४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीन दिवसांत चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता पर्यंत ९५० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रतिदिन कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. मागील तीन दिवसांत तब्बल तीस व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनामध्ये चिंता तर नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वाढत्या थंडी बरोबरच कोरोनाचे रुग्णही वाढत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत १०७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात १५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच तीन दिवसांत ७३ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून १५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ८०९५ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आहेत. त्यामध्ये ४११९ आरटीपीसीआर चाचण्या तर ३९७६ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. ५९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ७ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.
तीन दिवसांत तीस रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १० डिसेंबरला रासा व मुकुटबन येथील प्रत्येकी एक, ११ डिसेंबरला प्रगती नगर येथील चार, रंगनाथनगर, बन्सलनगर, ढुमेनगर, देशमुखवाडी, रंगारीपुरा येथील प्रत्येकी एक व्यक्ती, भिलार टाऊनशिप दोन, मंदर, चिखलगांव, गणेशपूर येथील प्रत्येकी एक व्यक्ती तर १२ डिसेंबरला मनीष नगर येथील दोन, इस्लामपुरा दोन, चिखलगांव दोन, गणेशपूर दोन, बन्सलनगर, जी.प. कॉलनी, फाले ले-आऊट, मुरधोनी, वागदरा, पठारपूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता प्रशासन निरनिराळ्या उपाययोजना व धोरण आखत आहे. नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.