WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

इंधनवाढ व रावसाहेब दानवेंच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा तालुका शिवसेनेकडून निषेध

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बेलगाम वक्तव्य करून आंदोलक शेतकऱ्यांना चीन आणी पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे संबोधल्याने शिवसेना आक्रमक झाली असून तालुका शिवसेनेच्या वतीने १२ डिसेंबरला दुपारी एक वाजता वरोरा टी-पॉईंट येथे आंदोलन करून केंद्रीय मंत्री दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच गगनाला भिडलेली महागाई व सातत्याने वाढत असलेले पेट्रोल डिजलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. वरोरा टी-पॉईंट येथे मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्यात आल्याने वाहतुक रोखली जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरित आंदोलनस्थळ गाठत शिवसेना पदाधिकाऱ्यांना मुख्य मार्ग मोकळा करून देण्याच्या सूचना केल्याने शिवसैनिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या आंदोलनात शेतकरी नसून दुसरेच लोक आहेत. पाकिस्तान आणि चीनकडून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात असल्याचे वक्तव्य केले होते. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.

त्या अनुषंगाने १२ डिसेंबरला वणीत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी बोढेकर, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, झरी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुग्गुल, शिवसेनेचे गणपत लंडांगे, मोरोपंत पोतराज, सतीश आदेवार, विनोद उप्परवार, पवन राऊत, मितनाथ काकडे, महेश चौधरी,दिगांबर पावडे, शेख हसन, प्रशांत बल्की आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share