शहरातील पान सेंटरवर पोलिसांची धाड, जप्त केला साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू
शहरातील फाले ले-आऊट येथील पान सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या विक्री करिता साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखु जप्त करून पान सेंटर चालक व वितरक या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले आहे. रात्री शहरात गस्त घालत असतांना पोलिसांना फाले ले-आऊट मधील मुन्ना पान सेंटरमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री करिता साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. सुगंधित तंबाखाचा साठा करून विक्री करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले असतांनाही अवैधरित्या सुगंधित तंबाखाची विक्री करण्यात येत असल्याचे समजताच डीबी पथक व शहर पोलिसांनी सदर पान सेंटरवर धाड टाकून ७१ हजार ४९४ रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. तसेच पान सेंटर चालक मृणाल नवनाथ वेलेकर (३३) रा. फाले ले-आऊट व वितरक निरज रमेशचंद्र गुप्ता (२८) रा. आमराई वार्ड क्रं १ घुग्गुस या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
सुगंधित तंबाखू साठवणे व विक्री करणे यावर शासनाने प्रतिबंध लावले असतानाही शहरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु आहे. सुगंधित तंबाखाचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांकडून दामदुपटीने सुगंधित तंबाखू खरेदी करून चढ्या दराने ग्राहकांना तंबाखू मिश्रित पदार्थांची पान ठेल्यांवरून विक्री करण्यात येते. शहरात कुठे चोरून लपून तर कुठे राजरोसपणे पान सेंटर मधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. शहरातील फाले ले-आऊट येथील मुन्ना पान सेंटरमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू साठवून सर्रास विक्री होत असल्याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी १८ डिसेंबरला रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान मुन्ना पान सेंटरवर धाड टाकून मजा १०८ हुक्का तंबाखूचे २०० ग्राम वजनाचे डब्बे किंमत ६३ हजार ४२० रुपये, मजा १०८ हुक्का तंबाखूचे ५० ग्राम वजनाचे ९ डब्बे किंमत १७१९ रुपये, पान पराग सुप्रीम १०२ ग्रामचे १२ डब्बे किंमत ३६०० रुपये, अन्नी गोल्ड स्वीट सुपारी १०० ग्राम वजनाचे ४६ पॉकिट किंमत २७६० रुपये असा एकूण ७१ हजार ४९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पान सेंटर चालक मृणाल वेलेकर याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम २६(२), २७, ३०(२)(अ), २३, ५९ व अन्न सुरक्षा आणी मानके अधिनियम २००६ सह कलम १८८,२७३, २७२, २६९, २७० नुसार गुन्हे दाखल केले आहे.
जप्त करण्यात आलेला सुगंधित तंबाखू घुग्गुस येथील आमराई वार्ड येथे राहणाऱ्या निरज रामचंद्र गुप्ता याच्या कडून घेण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात आरोपी केले आहे. पोलिसांनी याआधी २८ ऑक्टोबरला अशाच प्रकारची कार्यवाही करून मालवाहू ऑटोत अवैधरित्या शहरात विक्रीकरिता येणारा २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केल्याने साठेबाजांचे धाबे दणाणले होते. सदर सुगंधित तंबाखू एका नामंकित होलसेल व्यापाऱ्याकडे जात असल्याचे नंतर पोलीस चौकशीत समोर आले होते.
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली.