WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आज तब्बल अठरा व्यक्तींचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह

Image

corona update १९ Dec.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे वाटत असतांनाच आज तब्बल १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने थंडीची लहर कोरोनाचा कहर वाढविण्यास कारणीभूत ठरते की काय, ही भीती वाटू लागली आहे. आज तब्बल १८ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. १८ व १९ डिसेंबर या दोन दिवसांत २५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासन चिंतेत आले आहे. तर नागरिकांमध्ये परत एकदा भीती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत २५ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०८८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ७९ झाली आहे. दोन दिवसांत १३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता पर्यंत एकूण ९८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

प्रतिदिन कमी प्रमाणात आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत आज अचानक वाढ झाल्याने प्रशासन चिंतेत आले आहे. वाढत्या थंडी बरोबरच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढू लागल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे. कोरोनाचा कहर वाढणार नाही याकरिता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना परत जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी वावरतानाही नागरिक मास्क बांधणे टाळत आहेत. सोशल डिस्टंसिंगचा तर आता सर्वांनाच विसर पडला आहे. वारंवार हात धुनेही नागरिक टाळू लागले आहेत. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. आज प्राप्त झालेल्या ४४ तपासणी नमुन्यांच्या अहवालामध्ये १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर आज करण्यात आलेल्या २१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ५७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३२ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, २८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १९ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथील तीन, देशमुखवाडी तीन, प्रगती नगर एक, गांधी चौक एक, चिखलगावं चार, गणेशपूर एक, भालर टाऊनशिप तीन मुकुटबन एक तर घुग्गुस येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर काल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शिंदोला माईन्स येथील दोन, विठ्ठलवाडी, वामनघाट रोड, चिखलगांव, पठारपूर, भालर टाऊनशिप येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता. विठ्ठलवाडी परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत असल्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याठिकाणी आता पर्यंत एकूण ३८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना पासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्याकरिता कोरोना विषयक नियम व सूचनांचे पालन करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share