अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांवर नेहमीच लागतो जाम
शहरातील वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली असून अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर नेहमी जाम लागतांना दिसत आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी करण्यात येत असल्याने रहदारीला अडथळे निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होतांना दिसत आहे. दुकानांमधील साहित्य व नाम फलके अगदी रस्त्यावर ठेवल्या जात असल्यानेही रहदारीला अडथळे निर्माण होत आहे. काही चिल्लर विक्रेत्यांनी रस्त्यांवरच दुकाने थाटल्याने रस्ते अगदीच अरुंद झाले आहेत. टिळक चौकातून इंदिरा चौक मार्गे पंचशील नगर मधून मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढीस लागल्याने या रस्त्याला मुख्य रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वणी चंद्रपूर राज्य महामार्गाकडे व गावखेड्यांकडे जाणारा हा सहज सोपा मार्ग असल्याने या मार्गाने छोट्या वाहनांची नेहमी रेलचेल असते. पण आता पथकर वाचविण्याकरिता छोट्या मालवाहू वाहनांबरोबरच ट्रक ट्रेलर सारखी वाहनेही या वर्दळीच्या रस्त्याने जाऊ लागल्याने हा रस्ता नागरिकांकरिता धोकादायक ठरतांना दिसत आहे. सतत या रस्त्याने मालवाहू वाहने धावत असल्याने हा रस्ता नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो. दिवसातून कित्येकदा या रस्त्यावर जाम लागताना दिसतात. रस्त्यांवर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा उभी करण्यात येत असलेली वाहने, पथकर चुकविण्याकरिता शहरातून जाणारी वाहने, यामुळे शहरात वाहतुकीची समस्या आणखीच बिकट बनली आहे.
त्याचप्रमाणे शहराबाहेरील रस्त्यांवरही कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे वाहतुकीच्या समस्येत भर पडल्याचे दिसून येत आहे. कोळसा वाहतूक करणारी वाहने तासंतास रस्त्यावर उभी रहात असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळे निर्माण होताना दिसतात. बहुतांश कोल ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे कॅम्प रस्त्यालगतच असल्याने वाहनांची दुरुस्तीची कामे रस्त्यावरच केली जातात. घुग्गुस - यवतमाळ राज्य महामार्गावरील पथकर नाक्या पासून तर लालपुलिया पर्यंत असंख्य कोल ट्रांसपोर्टींग कंपन्यांचे कॅम्प रस्त्यालगत असल्याने कोळसा वाहतूक करणारी वाहने नेहमी रस्त्यांवरच उभी असलेली पाहायला मिळतात. वाहतूक नियंत्रणाकरिता वरोरा टी-पॉईंट जवळ वाहतूक पोलिस नेहमीच तैनात असतात. पण टी-पॉईंट जवळील वळण रस्त्यावर रांगेत उभी असलेली कोळसा वाहतूक करणारी वाहने त्यांच्या दृष्टीस पडू नये याचेच नवल वाटते. समोरून येणारे वाहन दिसणार नाही अशा पद्धतीने वळण रस्त्यावर वाहने उभी केलेली असतात. छोट्या वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास चलान करणारे वाहतूक पोलीस राज्य महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने कोळसा वाहतुक करणारी वाहने उभी असतांनाही चलान तर सोडाच रस्ता मोकळा करण्याच्या सूचनाही देताना दिसत नाही. वरोरा टी-पॉईंट कडून शहराकडे येणाऱ्या रस्त्यालगत कोल ट्रांसपोर्टींगचा तयार करण्यात आलेला कॅम्प या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. कॅम्प अगदीच रस्त्यालगत असल्याने कॅम्प मधून अचानक निघणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगत कोळसा वाहतूकदारांचे कॅम्प असल्याने रस्त्यावरच गाड्या दुरुस्तीची कामे करण्यात येतात. तासंतास वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याबरोबरच या ठिकाणांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांचा नेहमी जीव भांड्यात पडलेला असतो. उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे कित्येक अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुरु असलेली वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.