तालुक्यातील खाजगी कंपन्यांमध्येही रोजगार मिळविण्याकरिता द्यावा लागतो वशिला
तालुक्यात रोजगाराच्या पुरेशा वाटा उपलब्ध नसल्याने बेरोजगारीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. युवकांच्या हातांना कामे नसल्याने ते रोजगारांकरिता वणवण भटकतांना दिसत आहे. तालुक्यातील प्रा. ली. कंपन्यांमध्येही स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगार दिला जात नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे. बेरोजगारीने होरपळलेले कित्येक युवक दररोज कंपन्यांचे उंबरठे झिजवितात पण त्यांना नकार घंटाच ऐकायला मिळते. तालुक्यातील प्रा.ली. कंपन्यांना स्थानिकांचा विटाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रायव्हेट कंपन्यांमध्येही वशिलेबाजीचा प्रपोगंडा अवलंबिला जात असल्याचे उघडपणे ऐकायला मिळत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वशिल्यानेच कंपनीत रोजगार मिळत असल्याने नेत्यांच्या मर्जीतीलच लोकांना रोजगार मिळत असून बाकींना ताटकळत राहावे लागत आहे. कंपनींशी लागेबांधे असलेल्या राजकीय क्षेत्रातील लोकांनी तर रोजगार मिळवून देण्याकरिता युवकांकडून चिरीमिरी घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पैसे व ओळख असलेल्यांनाच कंपन्यांमध्ये रोजगार मिळवता आला. तर खरी रोजगाराची आवश्यक्ता असलेल्याना आजही कंपन्यांचे उबंरठेच झिजवावे लागत आहे. वशिलेबाजी व चिरीमिरीने अनुभवहीन लोकांनाही रोजगार मिळवता आले. परंतु त्या क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या युवकांना मात्र रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. स्थानिकांना ८० टक्के रोजगार देण्याचा आदेश असतानाही या प्रा.ली. कंपन्यांनी तालुक्याबाहेरील लोकांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार दिल्याचे समोर आले आहे. त्यातल्यात्यात शफारशींच्या आधारावर अनुभवहीन लोकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार दिल्याचे पाहायला मिळत आहे.
तालुक्यात बेरोजगारीची समस्या आणखीच गंभीर झाली आहे. तालुक्यात अनेक कोळसा खदाणी असतांनाही स्थानिकांना हवा तसा रोजगार उपलब्ध होताना दिसत नाही. कोळश्यावर आधारित उद्योग व कंपन्यांमध्ये स्थानिकांना पुरेपूर रोजगार दिला जात नाही. तालुक्यातील बहुतांश खदाणीत कोळसा उत्खननाचे काम सुरु असून खदाणीतील माती उत्खननाच्या करारावर अनेक प्रा.ली. कंपन्या तालुक्यात अवतरल्या आहेत. तालुक्यात कंपन्या आल्याने येथील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल ही रास्त अपेक्षा असतांना तालुक्याबाहेरील लोकांनाच जास्त रोजगार देऊन कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांची क्रूर थट्टा केली आहे. याठिकाणी रोजगार देताना वशिलेबाजीचा प्रपोगंडा मोठ्या प्रमाणात चालवल्या गेला. राजकीय नेत्यांच्या शिफारशीनंतरच कंपन्यांमध्ये कामे मिळत असल्याने नेत्यांच्या जवळच्या लोकांचाच त्यात फायदा झाला. वशिलेबाजीने अनुभवहीन लोकांनाही रोजगार मिळाले. तर अनुभवी लोकांना कंपन्यांचे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय उरला नाही. वाहन चालविण्याचा दांडगा अनुभव असलेल्याना डावलून शिफारशिने आलेल्या नवख्याना कंपनीने रोजगार दिल्याने कित्येक वाहने क्षितीग्रस्तही झाली आहेत. वशिलेबाजीने रोजगार मिळत असल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. नोकरीस पात्र असलेल्या गरजू व्यक्तींना डावलून शफारशीने गेलेल्या व्यक्तींना कंपन्यांनी नोकरीत सामावून घेतल्याने बेरोजगार युवकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. स्थानिक लोकांपेक्षा तालुक्याबाहेरील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात आल्यानेही येथील लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यातल्यात कंपनीशी लागेबांधे असलेल्यानी चिरीमिरी घेऊन लोकांना रोजगार मिळवून दिल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक लोकांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळत आहे. लायक युवकांना डावलून नवख्याना संधी देण्यात आल्याने स्थानिक बेरोजगार युवक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही बोलले जात आहे.