WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ओबीसी मोर्चाला विविध समाज संघटनांचा पाठिंबा, नगराध्यक्ष व नागरसेवकांनीही मोर्चाच्या नियोजना संदर्भात घेतली सभा

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

ओबीसींची स्वतंत्र कॉलममध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी तीव्र स्वरूपात शासन दरबारी मांडण्या करिता ओबीसी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३ जानेवारीला तलसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या विशाल मोर्चाला बहुतांश समाज संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून आज २८ डिसेंबरला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचारी नगरसेवक व नागरसेविकांची सभा घेण्यात येऊन त्यात मोर्चाचे आयोजन व नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ओबीसींची स्वतंत्र कॉलममध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची आवश्यकता असल्याबद्दलही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

केंद्र सरकारने २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र कॉलममध्ये जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला घेऊन ३ जानेवारीला तहसील कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याच्या आयोजन व नियोजना संदर्भात नगराध्यक्ष व नगरसेवकांची सहविचार सभा संपन्न झाली. त्यात जातीनिहाय जनगणनेची आवश्यक्ता व त्याचे फायदे याबाबत ओबीसी जातीनिहाय जनगणना समितीचे मुख्य समन्वयक मोहन हरडे यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी समुदायाच्या (VJ/DNT/NT/SBC) सर्वांगीण विकासाकरिता जातीनिहाय जनगणनेची आवश्यक्ता व महत्व पटवून सांगतानाच मोर्चात सर्वच समाज व समाज संघटनांनी सहभागी होण्याचे आव्हान मोहन हरडे यांनी केले.

ओबीसींची मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झालेली नाही. १९३१ ला झालेल्या जनगणनेनंतर एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के असलेल्या ओबीसी समूहाला २७ टक्के आरक्षण देण्यात आले. या समूहामध्ये ६५०० पोटजातींचा समावेश आहे. कालांतराने ओबीसींची लोकसंख्या वाढली असतानाही आरक्षणाची टक्केवारी मात्र पूर्ववतच आहे. त्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाल्यास त्यांची लोकसंख्या निश्चिती होईल व या समुदायाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. ज्यामुळे त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व इतरही सुविधांचा योग्य लाभ घेता येईल. ओबीसींच्या विशाल मोर्च्याची तालुक्यात जय्यत तयारी सुरु असून मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग दर्शवावा याकरिता ओबीसी बांधवानी गाव खेड्यात जाऊन नागरिकांना मोर्चा बाबत मार्गदर्शन केले. मागील १५ दिवसांपासून जातीनिहाय जनगणना कृती समितीच्या नेतृत्वात ओबीसी समुदायातील लोकांनी तालुका पिंजून काढत, ठिकठिकाणी सभा घेत जनतेला मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान केले. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह सभेला उपस्थित असलेल्या नगरसेवक न नगरसेविकांनीही ओबीसी मोर्चात सामील होण्याचे जाहीर केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share