तालुक्यात मागील नऊ दिवसांत आढळले ३१ कोरोना बाधित रुग्ण
शहर व तालुक्यात कोरोनाचे संक्रमण सुरूच असून कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनही चिंतेत आले असून नागरिकांनी सावधानी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील नऊ दिवसांत ३१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २६ डिसेम्बरला तब्बल १७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. २२ ते ३० डिसेंबर या कालावधीत ३१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११३४ झाली असून एक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ३७ झाले आहेत. आणखी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या २५ झाली आहे.
कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाली असली तरी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. २२ ते ३० डिसेंबर या नऊ दिवसांत कोरोनाचे ३१ रुग्ण आढळले आहेत. प्रतिदिन कमी प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊन २६ डिसेंबरला तब्बल १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर २२,२३,२४,२५,२७,२८ व २९ डिसेंबर या सात दिवसांत केवळ सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आज ३० डिसेम्बरला ६ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मागील नऊ दिवसांत ६४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच नऊ दिवसांत २८४ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून त्यात २४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ८९४८ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात असून त्यामध्ये ४४८७ आरटीपीसीआर चाचण्या तर ४४६१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या ३७ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, ८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २१ रुग्ण यवतमाळ व इतरत्र भरती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भालर टाऊनशिप येथील दोन, केसुर्ली एक, शिरपूर एक, वारगाव येथील एक तर धोपटाळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण आढळतच असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.