भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त प्रतीकात्मक विजयस्तंभास करण्यात आले अभिवादन

भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रतीकात्मक विजयस्तंभ उभारून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवर व आंबेडकरी अनुयायांनी उपस्थिती दर्शवून विजयस्तंभास अभिवादन केले. सर्व प्रथम भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखे तर्फे विजयस्तंभास अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेऊन शूरवीरांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगावच्या इतिहासावर प्रकाश टाकत आत्मसम्मानासाठी लढल्या गेलेल्या या लढाईची यशोगाथा शब्दातून व्यक्त केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही हारार्पण करून जयघोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या प्रतीकात्मक विजयस्तंभास अभिवादन करण्याकरिता दिवसभर आंबेडकरी अनुयायांची गर्दी पाहायला मिळत होती. भीमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त अनेक आंबेडकरी संघटनांनी आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या प्रतीकात्मक विजयस्तंभाला अभिवादन केले.