अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर पोलिसांनी केली कार्यवाही, २९ जनावरांची केली सुटका !
जनावरांना निर्दयीपणे वाहनांत कोंबून परराज्यात विक्रीकरिता नेणाऱ्या पाच चार चाकी वाहनांवर पोलिसांनी कार्यवाही करून आठ आरोपींना अटक केली आहे. पाच चार चाकी मालवाहू वाहनांमध्ये २९ जनावरांना कोंबून चारापाण्याची व्यवस्था न करता परराज्यात विक्री करिता नेणाऱ्या पाचही वाहनांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गोवंशाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. जनावरांना रासा येथील गुरुमाऊली गौरक्षणमध्ये सोडण्यात आले आहे. पोलिसांनी २९ जनावरे व पाच चार चाकी वाहने असा एकूण २६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चार चाकी मालवाहू वाहनांमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने वरोरा रोडवरील नायगांव फाट्याजवळ सापळा रचून एका मागोमाग येणाऱ्या पाच वाहनांना थांबवून त्यांची झडती घेतली असता वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून असलेली गोवंश जनावरे आढळली. चारापाण्याची व्यवस्था न करता जनावरांना वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून परराज्यात विक्री करिता नेणाऱ्या पाचही वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली. पोलिसांना पाच वाहनांमध्ये तब्बल २९ जनावरे आढळून आली. पोलिसांनी गोवंशाची सुटका करून त्यांना रासा येथील गुरुमाऊली गौरक्षण येथे सोडले. ३ जानेवारीला दुपारी ३ ते साय. ५ वाजताच्या दरम्यान डीबी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नायगांव फाट्यावर नाकाबंदी करून जनावरांची अवैधपणे वाहतूक करणारी MH २७ X ११८९, MH ३४ AB २४७८, MH ३० BD २३३०, MH ३२ AJ ११९३, MH ३४ AV ०९३७ ही पाच मालवाहू वाहने ताब्यात घेऊन अफझल अफसर बेग (३४) रा. कायर, सय्यद इम्रान सय्यद जाफर (२४) रा. बेला जी. आदिलाबाद, सचिन महादेव थेरे (३७) रा. टूंडरा ता. वणी, शेख कलीम शेख हकीम (३४) रा. धोत्रा शिंदे ता. मूर्तिजापूर जी. अकोला, भोलाराम सुरेश पडोळे (२५) रा. डोर्ली ता. वणी, निलेश मधुकर आसुटकर (३७) रा. टूंडरा ता. वणी, नंदकुमार शिवसुंदर तिवारी (४६) रा. वरोरा जी. चंद्रपूर, रमेश शालिक पेंदोर (३८) रा. टूंडरा ता. वणी, या आठ आरोपीना अटक केली. त्यांच्या कडून २९ जनावरे अंदाजे किंमत ७ लाख ३० हजार रुपये आणी पाच चार चाकी मालवाहू वाहने अंदाजे किंमत १९ लाख ५ हजार रुपये असा एकूण २६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ अंतर्गत कलम ५(अ)९, प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० अंतर्गत ११(१), (ए)(बी)(ई)(एफ)(एच)(आय)(के) तसेच सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १३०(३)/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउपनि गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.