"दुल्हन आई है राजा, होके घोडे पे सवार", वधू पक्षाकडून निघालेल्या लग्न वरतीने फेडले डोळ्याचे पारणे !
लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर जिकडे तिकडेच लग्नाचे बार उडू लागले आहेत. शहरातही सध्या विवाह सोहळ्याची धूम सुरु असून लग्न वरातींनी शहरातील रस्ते गजबजून उठले आहेत. लग्न म्हटलं की वरपक्षाकडून निघणाऱ्या वरातीचं विशेष आकर्षण असतं. वाद्याच्या तालावर थिरकत व वरातीत थाटात मिरवत वधू मंडपी निघालेली वराकडील मंडळी लक्ष वेधून घेतांना दिसते. बँड बाजासह निघणाऱ्या वरातीत घोड्यावर स्वार झालेला नवरा मुलगा व वाद्यावर बेधुंद होऊन नाचणारी वर पक्षाकडील मंडळी लग्न वरातीचे खास आकर्षण असते. लग्न वरातीत वाजत गाजत घोड्यावर बसून वधू मंडपी जाणारा नवरदेव सर्वांनीच पहिला आहे. पण लग्न वरातीत घोड्यावर बसून लग्न मंडपी जाणारी नवरी मुलगी पाहून शहरवासीही थक्कच राहिले. तीन चार दिवसांआधी शहरात बँड बाजासह निघालेल्या एका लग्न वरातीत चक्क वधू घोड्यावर स्वार होऊन लग्न मंडपी जात असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. सर्वच जण घोड्यावर बसलेल्या त्या नवऱ्या मुलीकडे कुतूहलाने पहात होते. रस्त्याने जाणारा प्रत्येक जण उभा राहून त्या लग्न वरातीकडे पाहतांना थकत नव्हता. घोड्यावर तोऱ्यात बसून लग्न मंडपी निघालेली नवरी मुलगी पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते. तर दुसरीकडे घोड्यावर बसून लग्न वरात काढण्याची कुणा एकाची मक्तेदारी नसल्याचे वधू पक्षाकडील निघालेल्या या वरातीने स्पष्ट केले आहे. लग्न वरातीत घोड्यावर स्वार झालेली नवरी मुलगी बघून प्रत्येकच जण आश्चर्य चकीत होत होता. आज पर्यंत चित्रपटांमध्येच महिला व मुली घोड्यावर बसल्याचे पाहायला मिळाले. क्वचित एखाद्या चित्रपटात घोड्यावर बसून लग्न मंडपी जाणारी नवरी पाहायला मिळाली असेल. पण समानतेच्या या काळात चक्क नवरी मुलगी घोड्यावर स्वार होऊन लग्न वरातीत दिसल्याने बघणाऱ्यांनीही तोंडात बोटे टाकली. "घोडे पे होके सवार चला है दुल्हा यार" असे म्हणण्या बरोबरच आता "दुल्हन आई है राजा, होके घोडे पे सवार" असेही गर्वाने म्हणावे लागणार आहे.
मुलींनी रूढी व परंपरेला बगल देत कित्येक सोपस्कार पार पाडले आहेत. कित्येक जबाबदाऱ्या स्त्रियांनी यशस्वीपणे पेलेल्या आहेत. पुरुषांची मक्तेदारी झुगारून अनेक क्षेत्रात स्त्रियांनी उंच भरारी घेतली आहे. वर्षानुवर्ष लादल्या गेलेल्या प्रथा परंपरेला मूठमाती देत पुरुषांची मक्तेदारी असलेली कार्यही महिलांनी पार पाडली आहेत. सावित्रीच्या लेकी कोणत्याही कार्यक्षेत्रात मागे येणार नाही, हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध करून दाखवले आहे. आता लग्न वरातीतही मुलींना सन्मान देऊन घोड्यावर बसवून थाटात लग्न मंडपी नेले जात असल्याने खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता नांदू लागल्याचे दिसून येत आहे.