डॉक्टरांच्या उपचारानंतर तरुणाचा मृत्यू, कुटुंबीयांची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तर डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ उद्या दवाखाने बंद
शहरातील रंगनाथ नगर येथील एका तेवीस वर्षीय आजारी तरुणाचा दिपक चौपाटी परिसरातील डॉक्टरांच्या उपचारानंतर लगेचच मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाचे कुटुंबीय व नातलगांनी केली आहे. तर कोणतीही शहानिशा न करता डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी उद्या २१ जानेवारीला एक दिवसीय संप पुकारला आहे. उद्या शहरातील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय संघटनांनी जाहीर केले आहे.
डॉक्टरांच्या औषोधोपचारानंतर काही वेळातच तरुण दगावल्याने डॉक्टरांवर रोष व्यक्त करून परिसरातील नागरिकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की करीत दवाखान्याची तोडफोड केली. पोलिसांनी समयसूचक्ता दाखवीत वेळीच घटनास्थळ गाठून मध्यस्थी करीत जमावाच्या तावडीतून डॉक्टरांची सुटका करून जमावाला शांत केले. परंतु तरण्याबांड मुलाचा एकाएक मृत्यू झाल्याने कुटुंबीय व नातलगांच्या मनातील धग अद्यापही धुमसत असल्याने नातलग त्याला न्याय मिळवून देण्याकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीय व नातलगांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे. तर कोणतीही शहानिशा न करता डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी उद्या २१ जानेवारीला शहरातील दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शहरातील सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचे वैद्यकीय संघटनांनी जाहीर केले आहे.
रंगनाथ नगर येथील आकाश हनुमान पेंदोर या तेवीस वर्षीय तरुणाला अस्वस्थ वाटत असल्याने दिपक चौपाटी परिसरातील नृसिंह व्यायामशाळे लगत असलेल्या डॉ. पद्माकर मत्ते यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता नेण्यात आले. डॉ. पद्माकर मत्ते यांनी त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला दोन इंजेक्शन दिले. तसेच लिहून दिलेल्या औषधी गोळ्या घेऊन आराम करण्यास सांगितले. आकाशला घरी आणल्यानंतर त्याला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या दिल्या असता अचानक त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला लगेच शहरातील मल्टीस्पेशॉलिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना सांगितले. आकाश याचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी थेट डॉ. पद्माकर मत्ते यांचा दवाखाना गाठला. पाहता पाहता त्याठिकाणी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक जमले. डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचाराने तरुणाचा बळी गेल्याची धारणा झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दवाखान्याची तोडफोड करीत डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत डॉ. मत्ते यांची जमावाच्या तावडीतून सुटका करीत पोलीस स्टेशनला आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मृतदेहाचे शवविच्छेदनही ग्रामीण रुग्णालयात करण्यास विरोध केल्याने रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनाकरिता यवतमाळला हलविण्यात आला. नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे यवतमाळला छायाचित्रणात शवविच्छेदन करण्यात आल्याचे समजते. अनाहक मुलाचा बळी गेल्याने दुःखात बुडालेल्या नातलगांनी न्यायाच्या अपेक्षेत डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तर कोणतीही शहानिशा न करता डॉक्टरांवर आरोप करीत त्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय संघटनांनी उद्या शहरातील सर्व दवाखाने बंद ठेऊन एक दिवसीय संप पाळण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांविषयीची तक्रार व डॉक्टरांना मारहाण केल्याचा निषेध या दोन्ही बाजू पोलिसांना योग्यरीत्या हाताळाव्या लागणार आहे.