दारू तस्करी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
मालवाहू वाहनामधून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून पोलिसांनी पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मारेगाव कडून येणाऱ्या एका टाटा मॅक्सिमो वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून डीबी पथकाने नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचून सदर मालवाहू वाहनाला रोखून वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी मालवाहू वाहनावर कार्यवाही करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. शहरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतांनाच दारू तस्करीवरही पोलिस बारीक नजर ठेऊन आहेत. दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच शहरात बंदिकाळात दारू विकणाऱ्यांचीही पोलीस माहिती काढत आहेत. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची दारूची तहान भागविण्यात वणी तालुक्याचाही बरोबरीचा वाटा राहिला आहे. त्यामुळे तालुक्यातून होणारी दारू तस्करी रोखण्याकरिता आता पोलिसांनी कंबर कसली आहे. तसेच बंद काळात शहरात अवैधरित्या दारू विकणाऱ्यांच्याही पोलिसांकडून कुंडल्या तयार करण्यात येत आहे.
शहरात पेट्रोलिंग करीत असतांना डीबी पथकाला मारेगांव कडून येणाऱ्या एका मालवाहू वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी गोपनीय पद्धतीने नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचून मारेगाव मार्गे शहरात दाखल झालेल्या मालवाहू वाहनाला रोखून वाहनांची झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या ३१ पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी टाटा मॅक्सिमो MH २९ T ५६६७ या मालवाहू वाहनाला ताब्यात घेऊन दारूची तस्करी करणाऱ्या रुपेश शंकर आत्राम (२३) रा. गोकुलनगर, अक्षय महादेव आवारी (२२) रा. कुरई या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या जवळून ९० मिली. च्या देशी दारूच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या ३१ पेट्या किंमत अंदाजे ८० हजार १८४ रुपये व दारूच्या तस्करीसाठी वापरण्यात आलेले मालवाहू वाहन किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख ८० हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कलम ६५(अ)(ई) व महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या ८२,८३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, डी.बी. पथक प्रमुख गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, हरिन्द्र भारती, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार, चालक प्रशांत आडे यांनी केली.