सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर, महिलांसाठीची सोडत ४ फेब्रुवारीला जिल्हा कार्यालयातुन होईल जाहीर !
जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गावपुढाऱ्यांना वेध लागले होते ते सरपंच पदाच्या आरक्षणाचे. काल २ फेब्रुवारीला तालुक्यातील सर्व १०१ ग्रामपंचायतेचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. अनपेक्षित निकालानंतर अनपेक्षित आरक्षण जाहीर झाल्याने काही गावपुढाऱ्यांमध्ये आनंद तर काही गाव पुढाऱ्यांचा हिरमुस झाल्याचे पाहायला मिळत होते. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच समर्थित पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्याचे दावे केले होते. आता सरपंच पदाच्या सोडतीनंतर सरपंच पदाची माळ आपल्याच पॅनलच्या उमेदवाराच्या गळ्यात पडावी याकरिता गाव पुढाऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. अनुसुचित जाती ६, अनुसूचित जमाती ११, नागरिकांचा मागास प्रवर्ग २७ व सर्वसाधारण वर्गासाठी ५७ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. यातील ५० टक्के ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव राहणार असून उद्या ४ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा कार्यालयात महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतेच्या या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी नव्या दमाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निवडून आणले. दिग्गजांना नाकारून गावासाठी काही तरी करण्याची तळमळ असणाऱ्या नवीन सदस्यांना मतदारांनी संधी दिली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनपेक्षित निकाल जाहीर झाले. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाची उत्सुकता दिसून येत होती. आता आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने सदस्य व गावपुढारी सरपंच पद आपल्या पॅनलकडे खेचून आणण्याच्या तयारीला लागले आहेत. गावाचे नवीन कारभारी गावाच्या समस्या सोडविण्याला कितपत प्राधान्य देतात, यावर गावकऱ्यांनी टाकलेली विश्वासहर्ता सिद्ध होणार आहे. ५० टक्के ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार असल्याने त्या स्वतः कौशल्य सिद्ध करतात की, त्यांचे पतिदेवचं पुढेपुढे करतात यावरही पुढील रणनीती ठरणार आहे. गावागावात सरपंचपदाची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. तसेच सरपंच पदासाठीची चुरसही वाढली आहे. शासनाने सरपंचपदाचे आरक्षण रद्द केल्याने काहींचा हिरमोड झाला होता. आता नव्याने आरक्षण जाहीर झाल्याने नवनिर्वाचितांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत.
सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर झालेल्या गावांमध्ये अनुसूचित जातीसाठी चारगाव, कोलेरा, तेजापूर, कायर, चिखली, बाबापुर तर अनुसूचित जमातीसाठी पुरड (नेरड), राजूर कॉलरी, बेलोरा, निलजई, बोरी, ब्राह्मणी, मुंगोली, नायगाव (बु), गोवारी (कोना), नायगाव (खु), कृष्णानपूर इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी अहेरी, उकनी, उमरी, कळमना (बु), कुंड्रा, कुंभारखणी, कुर्ली, केसुर्ली, कोना, कोलगाव, खांदला, गणेशपूर, गोवारी (पार्डी), चाणखा, चिंचोली, चिखलगाव, चिलई, झोला, ढाकोरी(बोरी), तरोडा, नवरगाव, निंबाळा (बु), निळापूर, निवली, पठारपूर, परामडोह, परसोडा, पिंपळगाव, बेसा, बोरगाव (में), बोर्डा, भालर, मंदर, मलकापूर, मानकी, मारेगाव (को), मेंढोली, मोहर्ली, येणक, रांगणा, रासा, लाठी, लालगुडा, वांजरी, वागदरा, वारगाव, विरकुंड, वेळाबाई, शिंदोला, शेलू (खु), शेलू (बु), शेवाळा, साखरा(दरा), सावंगी, सावर्ला, सुकणेगाव, सोनेगाव या ग्रामपंचायती राखीव आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता शिरपूर, कळमना(खु), कवडशी, कुरई, घोन्सा, टाकळी, डोर्ली, दहेगाव (पो), नांदेपेरा, निंबाळा (रोड), नेरड (पुरड), पळसोनी, पिंपरी (का), पुनवट, पुरड (पुनवट), पेटूर, भांदेवाडा, भुरकी, मजरा, माथोली, मुरधोंनी, मोहदा, वडगाव (टीप), वडजापूर, वरझडी, शिवणी (जहॉ), साखरा (को) या ग्रामपंचायती राखीव आहेत.