लालपुलियावर आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा पोलिसांचा कयास

वणी यवतमाळ रोड वरील लालपुलिया येथील कॅपिटल मोटर्स वर्कशॉप समोर २ फेब्रुवारीला एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पोलीसांनी अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून सदर युवकाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. वाहन चालक वाहनासह फरार झाला असून पोलीस तपास करीत आहेत. मृतकाची अद्यापही ओळख पटली नसून पोलीस मृतकाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. मृतक हा अंदाजे २२ ते २५ वर्ष वयोगटातील असून त्याची उंची ५ फूट ४ इंच आहे. त्याने फिक्कट शेंद्री रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला असून त्याच्या उजव्या हातावर आशिष हे नाव गोंदविलेले आहे. अशा वर्णनाचा युवक घरून बेपत्ता असल्यास, खूप दिवसांपासून घरी परतला नसल्यास किंवा कुणाच्या परिचयाचा असल्यास त्यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम २७९, ३०४(अ), सहकलम १३४ (अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एकाडे (९२८४४९६६०९) करीत आहेत.