माता रमाई जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन, प्रबोधनात्मक भीमगीतांचा होणार महासंग्राम !
माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा वणी यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून शहरातील कल्याण मंड्पम आंबेडकर चौक येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता होणाऱ्या उदघाट्न सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कायर जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका कुमुदिनी मोरेश्वर देवतळे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत तुकाराम सरदार व डॉ. रेखा मनोहर बडोदेकर उपस्थित राहणार आहेत.
उद्घटनानंतर परिसंवादाचा कार्यक्रम होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार हे "आंबेडकरी स्त्रियांपुढील समस्या व आव्हाने" या विषयावर तर डॉ. रेखा बडोदेकर "माता रमाईचे जीवनकार्य" या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सायंकाळच्या सत्रात प्रबोधनात्मक भीमगीतांचा महासंग्राम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता हिंगणघाट येथील प्रसिद्ध गायकांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम होणार असून भूषण काटकर, महानंद भगत, प्रज्ञा कीर्ती, रवींद्र पिल्लेवार या गायकांच्या सुमधुर आवाजात रमा भिमाची गाजलेली गीते ऐकायला मिळणार आहे. माता रमाई जयंती उत्सव समिती द्वारा आयोजित या प्रबोधनात्मक कार्यक्रमांना जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रमाई जयंती उत्सव शहरात ऐतिहासिक करण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.