शेतकऱ्यांचे वणी येथे रस्ता रोको आंदोलन, मोदी सरकारच्या विरोधात देण्यात आल्या घोषणा !
/p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला घेऊन मागील ७० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आज संयुक्त किसान मोर्चा वणी विभागाच्या वतीने वरोरा टी-पॉईंट येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे कायदे तयार केले असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र केल्या जात असल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. हे तीनही काळे कायदे रद्द करून एमएसपी कायदा लागू करण्याच्या मागणीला घेऊन दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संयुक्त किसान मोर्चा वणी विभागाच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविल्याने राजकीय पक्षांची नेते मंडळीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाली होती. तब्बल दोन तास आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतुकीवर त्याचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन स्थळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिशय शांततापूर्ण पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध नारेबाजी करीत डफली वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला.
काळे कायदे रद्द करण्याकरिता दिल्लीच्या सीमेवर मागील ७० दिवसांपासून सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन बळाच्या जोरावर दडपू पहात असलेल्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनन्वित यातना दिल्या. कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. लाठीचार्ज करण्यात आला. अश्रू धुळाच्या नळकांड्या त्यांच्या अंगावर फोडण्यात आल्या. त्यांना खालिस्थानी, नक्षलवादी संबोधण्यात आले. त्यांच्या सोई सुविधा बंद करण्यात आल्या. देशाच्या पोशिंद्यावर क्रूर प्रहार करणाऱ्या केंद्र सरकारने त्यांच्या मागणीची अद्यापही दखल घेतलेली नाही. तीनही काळे कायदे जोपर्यंत सरकार रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची शेतकरी संघटनांनी भूमिका घेतल्याने आज त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ संयुक्त किसान मोर्चा वणी विभागाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.