केसुर्ली येथील विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल
/p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यातील केसुर्ली येथील विवाहित महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी पती व सासू विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेची सासू व पती सतत पैशाची मागणी करून तिची शारीरिक व मानसिक प्रताडना करीत असल्याने तिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. तशी रीतसर तक्रारही त्यांनी वणी पोलीस स्टेशनला नोंदविली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करून पती व सासूला अटक केली आहे.
घुग्गुस येथील विजय सदाशिव नागपुरे यांची मुलगी स्नेहा हिचा दोन वर्षांपूर्वी केसुर्ली येथील क्रिष्णा गोविंदा मांढरे याच्या सोबत विवाह झाला होता. लग्नाला जेमतेम दोन वर्ष होत नाही तोच तिला माहेर वरून पैसे आणण्यासाठीचा तगादा लावून सासरच्या मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरु केले. पती कडून वारंवार होणारी पैशाची मागणी व त्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून स्नेहाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. लोभी पतीमुळे अवघ्या दोन वर्षाच्या संसारातच तिला मरण पत्करावे लागले. ५ जानेवारीला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घरी कुणी नसतांना स्नेहाने राहत्या घरी लाकडी फाट्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येची वार्ता कळताच वडील विजय नागपुरे यांना चांगलाच धक्का बसला. ते तडकाफडकी वणीला आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या भावना अनावर झाल्या व त्यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रूच्या धारा वहात होत्या. पती कडून पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला. ५ जानेवारीला रात्री ९ वाजता सासरच्या मंडळी विरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रारही त्यांनी पोलीस स्टेशनला दाखल केली. पोलिसांनी वडिलांच्या तक्रारी वरून स्नेहाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पती क्रिष्णा गोविंदा मांढरे (३३) व सासू अंजनाबाई गोविंदा मांढरे (५५) यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ४९८(अ), ३०४(ब), ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ६ जानेवारीला दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवांगी करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.