अज्ञात वाहनाच्या धडकेत विठ्ठलवाडी येथील व्यापाऱ्याचा मृत्यू, मारेगाव वरून वणीला येतांना मांगरूळ गावाजवळ झाला अपघात !

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या एका युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना वणी - मारेगाव रोडवरील मांगरूळ गावाजवळ आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. तुर खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा सदर युवक आपले व्यावसायिक काम आटपून मारेगाव वरून दुचाकीने वणीला येत असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह आधी मारेगाव रुग्णालयात आणला व नंतर वणी ग्रामीण रुग्णालयात रेफर केल्याचे समजते. उद्याला मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येईल. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
मोरगाव खरेदी विक्री संकुलनात तूर खरेदी करण्याकरिता गेलेल्या व्यावसायिकाचा मोरगाव वरून परत येत असतांना मंगरूळ गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मनोज सुभाष गायकवाड (३३) रा. विठ्ठलवाडी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मारेगाव येथील तूर खरेदीचे काम आटपून रात्री ७.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने वणीला येत असतांना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात तो जमिनीवर फेकल्या गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अत्यंत सुस्वभावी म्हणून परिसरात परिचित असलेल्या मनोज गायकवाड यांच्या मागे वृद्ध आई वडील, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे. काकांबरोबर मालवाहू गाड्यांच्या व्यवसायात उतरलेल्या मनोज यांनी नंतर धान्य खरेदी विक्रीच्या व्यवसायात जम बसविला. परिसरात सर्वांसोबत आपुलकीचे नाते निर्माण केलेल्या या युवकाच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करीत पती पत्नी व संसार वेलीवर फुलल्या तीन वर्षाच्या मुलाबरोबर सुखी संसारिक जीवन जगत असलेल्या मनोजला नियतीने हिरावून घेतल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरी यायला उशीर झाल्याने काळजीपोटी पत्नीने मनोजला केलेला फोन व मारेगाव वरून निघालो आहे, हा त्याने दिलेला प्रतिसाद पती पत्नी मधील शेवटचा संवाद ठरला.
पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत.